प्रगतशील शाळा, ज्ञानरचना वाद, प्रगत महाराष्ट्र अभियान यासह ‘ई-लर्निग’ वर भर देत शिक्षण विभाग शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आग्रही आहे. काही वर्षांत सातत्याने कमी होणारी पटसंख्या पाहता जिल्ह्य़ात शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ अभियानाला सुरूवात केली आहे. या अंतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा प्रवेश वाढविण्याचे आवाहन सध्या जिल्हा परिषद शाळांसमोर आहे.

जिल्हा परिषदेच्या पहिली ते आठवीसाठी तीन हजार २०० शाळा असून या ठिकाणी दोन लाख ७५ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आनंददायी शिक्षण, ज्ञानरचनावाद, प्रगत महाराष्ट्र, सिध्द शाळा यासह ई-लर्निग असे विविध उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरू आहेत.  काही ठिकाणी लोकसहभागातून ई लर्निग साहित्य मिळाल्याने दुर्गम अशा भागातही मुले नियमितपणे शाळेत येत आहेत. असे असतांना पेठ, दिंडोरी, सुरगाणा, कळवण, नांदगाव या तालुक्यांसह शहरातील काही ठिकाणी आजही स्थलांतर किंवा अन्य काही अडचणींमुळे विद्यार्थी पटसंख्येत वाढ झालेली नाही. काही ठिकाणी त्यात कमालीची घट होत आहे. ही पटसंख्या वाढविण्यासाठी आता शिक्षण विभागाने ‘गुढीपाडवा-प्रवेश वाढवा’ हे अभियान हाती घेतले आहे.

या संदर्भातील अहवाल हा संबंधित विभागाला सादर करावा. नव्या शैक्षणिक वर्षांत तालुक्यात किमान सरासरी दोन हजाराने पटसंख्या वाढविली जावी अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. सर्वाधिक पट संख्या असलेल्या तालुक्यातील तीन शाळांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी दिली. या सर्व उपक्रमांची एकंदरीत अहवाल बैठक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जूनच्या शेवटच्या आठवडय़ात होणार आहे. दुसरीकडे शिक्षकांसमोर वार्षिक परीक्षेचे नियोजन, उन्हाळ्याची सुटी अशा स्थितीत अभियानाची अमलबजावणी करायची कशी, असा प्रश्न समोर आहे.

प्रबोधनात्मक उपक्रम

अभियानअंतर्गत उन्हाळी सुटीच्या कालावधीत नवमाध्यमे, जाहिराती, फलक आदींच्या माध्यमातून या अभियानाची प्रसिद्धी करण्यात यावी, शहरासह जिल्हा परिसरातून ठिकठिकाणी पथनाटय़, नाटिका, फेरीचाही यासाठी अवलंब करावा. पालकांशी प्रत्यक्ष संवाद साधत मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांचे प्रबोधन करावे. यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आधार घेण्यात यावा, आदी सूचना करण्यात आल्या आहेत.