शहर परिसरात राहणाऱ्या अनेक बँक खातेदारांच्या खात्यातून संशयितांनी जवळपास तीन लाखांहून अधिक रुपयांची रोकड पनवेल येथे एटीएम मशीनच्या माध्यमातून परस्पर काढल्याची घटना समोर आल्यानंतर एटीएमचा वापर करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. संशयितांनी तपशील चोरूनच हा डल्ला मारल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितांनी काही दिवसांपूर्वी नाशिक शहरातील यशवंत व्यायामशाळेसमोरील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमवरून अनेक खातेदारांचे संकेतशब्द व सिक्युरिटी सिस्टीम, एटीएमचा तपशील चोरून या चोरटय़ांनी संगणकाच्या मदतीने पनवेल येथील एटीएम मशीनमधून जवळपास तीन लाखांहून अधिकची रक्कम लंपास केली. या संशयितांनी एटीएमला स्कॅनिंग मॉर्फिन यंत्रणा जोडून मशीनचा डाटा चोरून ही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. नाशिकमधील हरीश कोतकर, जहीर सय्यद, भावना गायकवाड, भगवान भागवत व शांताराम गायकवाड यांचे आयसीआयसीआय व स्टेट बँक ऑफ इंडियात खाते आहे. त्यांच्या खात्यातून संशयितांनी प्रत्येकी सहा हजार ते ८० हजार रुपयांपर्यंत रक्कम परस्पर काढून घेतली. खातेदारांना त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे वळते झाल्याचे संदेश प्राप्त झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तक्रारदारांनी सरकारवाडा पोलीस ठाणे गाठत अर्ज दिला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक पनवेल येथे तपासासाठी रवाना झाले. अशा प्रकारे अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत सरकारवाडा व भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी केले. या प्रकरणी आतापर्यंत सात तक्रारी दाखल असून संशयितांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.