विद्यार्थ्यांमधील कल्पनाविष्कार समोर यावा तसेच त्यांच्यातील संशोधन वृत्तीला चालना मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आयजीएनआयटीई’ पुरस्कारासाठी येथील विस्डम हायस्कूलच्या देव देसाई याची निवड झाली आहे. त्याने शिवणकामास हातभार लागेल असे ‘स्टॅप्लर बटन’ संकल्पनेवर आधारित प्रकल्प तयार केला. डिसेंबरमध्ये माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या उपस्थितीतीत आयोजित सोहळ्यात देवला पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या दी नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशनच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांनी विषय शिक्षक किंवा पालक यांची मदत न घेता केवळ आपल्या मनातील एखादी संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. यंदा या स्पर्धेत १६ राज्यातील ५७६ जिल्हय़ातील ६५ हजार विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. या आधीही देवने चार चाकी वाहनाचा दरवाजा अचानक उघडला गेला तर अपघात घडू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने प्रकल्प सादर केला. या प्रकल्पास गतवर्षी पुरस्कार मिळाला. यंदाही त्याने स्पर्धेत सहभाग घेत शिवणकाम करताना कोणत्याही पोशाखात लावण्यात येणारे बटण, त्यासाठी लागणारा वेळ व मनुष्यबळ वाचविण्यासाठी ‘स्टॅप्लर बटण’ प्रकल्पाची निर्मिती केली. यामध्ये वेळ व श्रम वाचणार असून कामगारांच्या सुरक्षिततेला महत्त्व देण्यात आले आहे. या प्रकल्पाची दखल घेत त्याची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. देश पातळीवर झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील केवळ दोन विद्यार्थी संशोधकांची निवड या स्पर्धेत करण्यात आली आहे.