रांगोळी, ढोल-ताशाने स्वागत;  वाहतूक नियमांचे उल्लंघन; पावसाची हजेरी  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बुधवारी शहरात दाखल झाल्यानंतर काढण्यात आलेला रोड शो जल्लोषात पार पडला. चौकाचौकात रांगोळ्या काढून यात्रेचे स्वागत करण्यात आले, काही ठिकाणी ढोल-ताशाचा गजर करण्यात आला तर काही ठिकाणी युवकांकडून थरारककसरती करण्यात आल्या. रोड शो समारोप स्थळी पोहचण्याआधीच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने स्वागतासाठी रस्त्यावर उपस्थितांची तारांबळ उडाली.

पाथर्डी फाटा परिसरात महाजनादेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. दुपारी १२ नंतर परिसरातील रस्ते बंद करण्यास सुरूवात झाल्याने अघोषित संचारबंदी अनेकांनी अनुभवली. रोड शोच्या मार्गावर शुकशुकाट असतांना पाथर्डी फाटा येथे मात्र ढोल-ताशांचा अखंड गजर, पक्षाचा ध्वज उंचावणे, महिला कार्यकर्त्यांच्या फुगडय़ा, दुचाकी फेरी अशी जय्यत तयारी सुरू होती. काहींनी मुख्यमंत्र्यांना आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी साकडे घालण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी समज देत त्यांना ताब्यात घेतले. महाजनादेश यात्रेतील मुख्यमंत्र्यांच्या वाहनाची प्रतिकृती असलेले वाहन पाथर्डी फाटय़ावर ठेवण्यात आल्याने अनेकांनी वाहनाजवळ उभे राहत, पक्षाचा ध्वज हाती घेऊन सेल्फी काढणे सुरू ठेवले.

नियोजित वेळेपेक्षा  यात्रा उशिराने शहरात दाखल झाली. तोपर्यंत यात्रेच्या स्वागतासाठी आलेल्या उत्साही कार्यकर्त्यांसह नागरिकांना थोपविणे हे पोलिसांसमोर आव्हान होते. नागरिकांचा उत्साह पाहता काहींना दंडुक्यांचा प्रसाद मिळाला.

गर्दीच्या गदारोळात स्वत:चे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी पक्षात नव्याने आलेले आणि उमेदवारीसाठी इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शनाचा केविलवाणा प्रयत्न सुरूच राहिला. सायंकाळी महाजनादेश यात्रेचे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीचा कहर केला. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी महापौर रंजना भानसी, आमदार सीमा हिरे आणि अन्य पदाधिकारी होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर यात्रा सिडकोकडे मार्गस्थ झाली आणि रोड शो सुरू झाला.

रोड शोदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मार्गावरील दुकाने बंद करण्याची सूचना केली होती. पोलिसांच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. मार्गावरील इमारतींच्या वरील भागाचा ताबा पोलिसांनी घेतला होता. मार्गावरील घडामोडींवर या माध्यमातून लक्ष देण्यात येत होते. मार्गावर विश्व जिज्ञासा मंडळाकडून मल्लखांबचे प्रात्यक्षिक करण्यात आले. सप्तशृंगी आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पर्यावरणाच्या प्रश्नाकडे पथनाटय़ातून लक्ष वेधले. विविध योगासने, लेझिम, ड्रमसेट असे विविध खेळ आणि कसरती रोड शो मार्गावर करण्यात आल्या.

वाहतूक नियमांचे तीनतेरा

रोड शोदरम्यान भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी दुचाकी फेरी काढली. फेरीच्या नियोजकांनी त्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याकरिता आचारसंहिता केली होती. सर्व जण वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करतील, असे सांगण्यात आले होते. परंतु, फेरीतील वाहनचालकांनी नियमांना केराची टोपली दाखविली. फेरीत सहभागी झालेल्या बहुतेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घातलेले नव्हते. एकाच दुचाकीवर तीन जण असलेलेही दिसून आले. यात्रा सुरू होण्याआधी या उत्साही कार्यकर्त्यांची हुल्लडबाजी सुरू होती. एरवी वाहतूक नियमांवर बोट ठेवणाऱ्या शहर वाहतूक पोलिसांनी याबाबत मात्र हाताची घडी तोंडावर बोट ठेवणे पसंत केले.

आमदार सीमा हिरे यांची फुगडी:- यात्रेदरम्यान काही महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडय़ा घातल्या. आमदार सीमा हिरे या ही  त्यात सहभागी झाल्या. भाजपच्या नगरसेविका या पारंपरिक वेशभुषेत आल्या होत्या. हिरव्या रंगाच्या साडय़ा,  भगवा फेटा, पारंपरिक आभुषणे घालत त्यांनी दुचाकी फेरीत सहभाग घेतला