नमुने तपासणी साहित्याच्या तुटवडय़ावर विरोधक आक्रमक

नाशिक : करोनाच्या अधिकाधिक तपासण्यांची गरज भाजप नेत्यांकडून राज्यात सर्वत्र मांडली जात असतांना नाशिकमध्ये महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या कार्यपध्दतीमुळे तपासणी साहित्याचा तूटवडा निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. नमुना तपासणी संचांसह घरोघरी सर्वेक्षण आणि तपासणीचा विषय रखडला आहे. या मुद्यावरून भाजप आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बुधवारी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा ते घेणार आहेत. मुंबई, ठाणे महापालिकेच्या तुलनेत नाशिकमध्ये राजकीय स्थिती वेगळी आहे. नाशिक महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. अधिकाधिक तपासण्यांची निकड ते शहरात मांडतील की नाही, याकडे विरोधी शिवसेनेसह इतर राजकीय पक्षांचे लक्ष आहे.

शहरात करोनाचा उद्रेक झाला असतांना नमुने तपासणीसाठी लागणाऱ्या साहित्याचा तूटवडा आहे. या सामग्रीच्या खरेदीसाठी दोन कोटींचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मंजूर झाला होता. पण त्याची पुढील प्रक्रिया पार पडली नाही. त्यामुळे या साहित्याची आजतागायत खरेदी झालेली नाही. रुग्णांच्या तपासणीत अडचणी येत आहेत. भाजपच्या महापौरांनी प्रशासनाने अनेक बाबींची स्पष्टता केली नसल्याच्या कारणावरून स्वाक्षरी केलेली नाही. दुसरीकडे शिवसेनेने एका तपासणीमागे ९०० रुपयांची बचत होईल. ती होऊ नये असा भाजपचा प्रयत्न आहे की काय अशी शंका उपस्थित केली होती. महासभेत प्रस्ताव मंजूर होऊन १५ दिवस उलटूनही प्रशासनाकडे ठराव येत नसल्याने रुग्णांच्या जिवाशी सत्ताधारी भाजप खेळत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. शहरवासीयांशी निगडीत महत्वाच्या प्रश्नाकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षानेही आरोप केला आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने यावर ठोस पावले न उचलल्यास परिवर्तनवादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

नमुने तपासणी साहित्याच्या तूटवडय़ावरून राजकारण तापले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा आढावा ते राज्याच्या दौऱ्यातून घेत आहेत. राज्यात क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात नमुना तपासणी होत असल्याचा भाजपचा आक्षेप आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार रुग्णांची आकडेवारी लपविण्यासाठी तपासण्या करत नसल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगितले जाते. नाशिक शहरात दाट लोकवस्तीत करोनाचा वेगाने प्रसार होत आहे. बाधितांच्या संपर्कातील अनेकांना तपासण्या करण्याची इच्छा असूनही तपासणी होत नसल्याचा विरोधकांची तक्रार आहे. तपासणी साहित्याची उपलब्धता करण्याऐवजी भाजपने तो विषय रखडवल्याचा आक्षेप आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. त्या शहराची भाजपने काय अवस्था केली, याचाही त्यांनी आढावा घ्यावा, असे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी म्हटले आहे. करोना संकटात भाजपचे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले नाहीत.

खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची पिळवणूक होत असल्याच्या विषयात शिवसेनेने लक्ष घातले. व्हेंटिलेटरअभावी रुग्णांचा मृत्यू होत आहे. वैद्यकीय साहित्य उपलब्ध करण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपचा पालिका प्रशासनावर वचक नाही. नमुने तपासणीचे साहित्य, घरोघरी जाऊन प्रबोधन करणे आणि तपासणी करण्याचा विषयही बाजूला ठेवला गेल्याकडे विरोधी पक्षांनी लक्ष वेधले आहे.