जिल्हा परिषदेच्या उपक्रमास नागरिकांची साथ

नाशिक :  करोनामुळे लागू असलेल्या टाळेबंदीचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम झाला आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या  शिक्षण विभागातर्फे (प्राथमिक)  ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी ‘डिव्हाईस डोनेशन’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प असून जिल्ह्य़ातून ३० पेक्षा अधिक नागरिकांनी या चळवळीत सहभाग घेतला आहे.

यंदा वेगवेगळ्या क्षेत्रावर करोनाचा विपरीत परिणाम होत आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. जिल्ह्य़ातील साडेतीन हजार शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा श्रीगणेशा झाला असला तरी अद्याप काही ठिकाणी भ्रमणध्वनीचे जाळे नसल्याने समस्या येत आहेत.

या अडचणींवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने टाळेबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू रहावे यासाठी प्रयत्न सुरू केले. गरजवंत विद्यार्थ्यांना साधनतंत्राची मदत व्हावी यासाठी ‘तंत्रसेतू नाशिक शिक्षण हेल्पलाइन’ उपक्रम हाती घेतला. राज्यात पहिल्यांदाच या धर्तीवर उपक्रम सुरू होत आहेत. या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी विद्यावाहिनी-आकाशवाणी नाशिकच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम सादर होतील.

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी  शिक्षण विभागाकडे संपर्क साधावा. यासाठी गूगलवर अर्ज आल्यानंतर संबंधितांनी अर्ज भरल्यानंतर तालुकास्तरावर त्रिसदस्य समिती या माहितीची खातरजमा करत त्या व्यक्तीकडून ते साहित्य संकलित करेल. याबाबत जिल्हास्तरावर माहिती देऊन ते कोठे आणि कसे वितरित होईल याचे नियोजन होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

उत्स्फूर्त प्रतिसाद

उपक्रमासाठी पहिल्या टप्प्यात समाजातील गरजू विद्यार्थ्यांना मदतीकरिता वापरात नसलेले भ्रमणध्वनी, लॅपटॉप, संगणक नागरिकांनी शिक्षण विभागाकडे जमा करावे, असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देतांना कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सुरेखा दराडे यांनी दोन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी एक भ्रमणध्वनी दिला. १५ दिवसांत या मोहिमेत २९ नागरिकांनी सहभाग घेत आपल्याकडे वापरात नसलेले जुने भ्रमणध्वनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे जमा केले आहेत.