राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; सटाणा येथे देवमामलेदार स्मारक नूतनीकरणाचे भूमिपूजन

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : एखाद्या अधिकाऱ्याला देवपण मिळणे फार क्वचित घडते. प्रत्येक व्यक्तीत चांगले आणि वाईट पैलू असतात. आपल्यातील देवत्वाला जागृत करण्याचा संदेश सर्व संतांनी दिला आहे. हा आदर्श संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातून घ्यावा. त्यांचे चरित्र प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही प्रेरणा देणारे असून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण प्रबोधिनीत ते पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

सटाणा येथील देवमामलेदार श्री यशवंत महाराज स्मारक नूतनीकरणाचे भूमिपूजन बुधवारी कोश्यारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सटाणा येथे आगमन झाल्यानंतर कोश्यारी यांनी देवमामलेदार श्री यशवंत महाराज मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. स्मारकाला भेट देऊन माहिती घेतली. देवमामलेदारांच्या जीवन चरित्रावर आधारित लघुपट निर्मितीसाठी निधी देण्याची तयारी दर्शविली.

समाजात सेवाभाव रुजविण्यासाठी देवमामलेदार श्री यशवंत महाराज यांच्या जीवनातील त्याग आणि समर्पणाचा आदर्श घरोघरी पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. जीवनात उंची गाठण्यासाठी सेवाभाव आवश्यक आहे.

सेवाकार्यात सर्वाचा सहभाग आवश्यक आहे. यशवंत महाराज यांचा शुद्ध चारित्र्य, असीम साहस आणि जनसेवेचा आदर्श समोर ठेवल्यास देश घडविता येईल, असेही राज्यपाल म्हणाले.

यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांनी देवमामलेदार यांच्या स्मारकामुळे सटाणा शहराचा विकास होईल, असा विश्वास व्यक्त केला.

प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चांगले काम केल्यास जनता देवत्व प्रदान करते हे दर्शविणारे देशपातळीवरील हे एकमात्र उदाहरण आहे. यातून आदर्श घेत जनतेसाठी काम करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. सटाणा शहरातील भूमिगत गटारीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सहकार्य करू.

जनसेवेचा आदर्श म्हणून हे स्मारक ओळखले जाईल, असे भुसे यांनी सांगितले. कार्यक्रमास पालकमंत्री छगन भुजबळ, खासदार सुभाष भामरे, आ. दिलीप बोरसे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज

अडचणीच्या काळात जनतेची सेवा करणे हे शासन आणि प्रशासनाचे कर्तव्य आहे. हे दोन्ही घटक मुळात जनसेवेसाठी आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सटाण्यातील कार्यक्र मात लक्ष वेधले. राज्यपालांच्या दौऱ्यावर मुंबईतील किसान मोर्चाची छाया होती. शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींना राज्यपालांनी भेट टाळली होती. हा धागा पकडून भुजबळ यांनी राज्यपालांना या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. हे स्थान अंधश्रद्धचे नसून ‘सेवा हाच धर्म’ असा संदेश देणारे आणि सर्व अंधश्रद्धा बाजूला सारून सेवेचा आदर्श प्रस्तुत करणारे हे देवस्थान आहे. जनता संकटात असताना देवमामलेदार यांनी जनतेला सहाय्य केले. त्या काळातील ते मोठे धाडस होते. शासन निर्णयाचा उपयोग जनतेला होण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी, याची प्रेरणा देवमामलेदारांच्या स्मारकातून मिळते. या तीर्थस्थंळाला ‘ब’ वर्ग दर्जा देण्यात येईल, असेही भुजबळ यांनी जाहीर केले. जिल्ह्यतील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्र्यंबकेश्वर, सप्तश्रृंगी गड, नस्तनपूर आणि टाकेदसारख्या तीर्थस्थळाचा विकास करण्यात आला आहे. पुढील ५० वर्षांचा विचार करून देवमामलेदार यांचे सर्व सुविधांनी युक्त, आकर्षक, प्रेरणादायी स्मारक उभारावे. त्यासाठी सर्व सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.