त्र्यंबकेश्वर येथे नियोजन विस्कळीत, दर्शनासाठी चार-पाच तास प्रतीक्षा

नाशिक : ‘हर हर महादेव’, ‘जय बम बम भोले..’च्या गजरात सोमवारी भल्या पहाटेपासून त्र्यंबकेश्वरसह विविध शिव मंदिरांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती

बारा ज्योतिर्लिगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरच्या शिव मंदिरात देवस्थान कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे नियोजन विस्कळीत झाले. दैनंदिन कामकाज, सुरक्षा आणि तत्सम कामांसाठी देवस्थानने तात्पुरत्या स्वरूपात १५० कर्मचारी नियुक्त केले. मात्र त्यांना अनुभव नसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. अखेर देणगी दर्शन बंद करण्यात आले. दर्शनासाठी एकच रांग ठेवून पूर्व दरवाजातून प्रवेश आणि दक्षिण दरवाजातून बाहेर अशी व्यवस्था करण्यात आली. भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे मोफत दर्शन रांगेतून दर्शनासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागत होता.

महाशिवरात्रीनिमित्त शहर आणि ग्रामीण भागातील बहुतांश मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. त्र्यंबकेश्वरच्या शिव मंदिरात पहाटे तीनपासून भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. पूर्व दरवाजात लोखंडी जाळ्या, मंडप टाकून दर्शन रांगेची व्यवस्था केली जाते. ही व्यवस्था अपुरी पडल्याने नाथपंथीय आखाडय़ापर्यंत दर्शन रांग होती. स्थानिक दर्शनार्थी, अभिषेक पूजा करणाऱ्यांची पश्चिम दरवाजातून सोय केली जाते, तर देणगी दर्शन अर्थात विशेष दर्शन उत्तर दरवाजातून सुरू होते. दरवर्षी देवस्थानचे १३५ कर्मचारी, सुरक्षारक्षक हे नियोजन सांभाळतात. विविध मागण्यांसाठी हे कर्मचारी संपावर असल्याने नियोजन विस्कळीत झाले.

दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली असताना दर्शन रांगांचे नियोजन नसल्याने भाविक नाराज झाले. तीन रांगांमधून भाविकांना प्रवेश देण्यास काहींनी आक्षेप घेतला. मंदिराचे गर्भगृह आकाराने लहान आहे. अनेकांची पिंडीपर्यंत जायला मिळावे अशी अपेक्षा असते. एकाच वेळी तिन्ही दरवाजांमधून भाविक येत असल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. देवस्थानने नव्याने नेमलेल्या हंगामी कर्मचाऱ्यांना गर्दीच्या व्यवस्थापनाचा फारसा अनुभव नाही. भाविकांनी तीन रांगांवर आक्षेप घेतला. दोनशे रुपये भरून देणगी दर्शन घेता येते. गर्दी पाहून अनेक भाविकांनी देणगी दर्शनाचा पर्याय निवडला. परंतु भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि गोंधळ होऊ लागल्याने देणगी दर्शन बंद करण्यात आले.

सकाळी रांगेत उभ्या राहिलेल्या भाविकांना तीन ते चार तासांच्या प्रतीक्षेनंतर दर्शन मिळाले. गोंधळ टाळण्यासाठी पूर्व दरवाजातून मंदिरात दर्शनासाठी एकच रांग सुरू ठेवण्यात आली. दुपारनंतर परिस्थिती काही अंशी आटोक्यात आली. तरीदेखील भाविकांच्या रांगा कमी झाल्या नव्हत्या. त्र्यंबकेश्वरप्रमाणे नाशिक शहर-ग्रामीण भागातील शिव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी

झाली. कपालेश्वर, सोमेश्वर, निळकंठेश्वर आदी मंदिरांत भाविकांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. पंचवटीतील कपालेश्वर महादेव मंदिरात पहाटे अभिषेक करण्यात आला. सायंकाळी श्री कपालेश्वर महादेवाची मिरवणूक काढण्यात आली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोखंडी जाळ्या उभारण्यात आल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत शिव मंदिरांमध्ये गर्दी कायम होती.

पालखी दर्शनासाठीही गर्दी

दुपारी देवस्थानातून सुवर्ण मुखवटा सजविलेल्या पालखीतून मंदिर, पांचआळीतून कुशावर्त तीर्थावर अभिषेक पूजेसाठी नेण्यात आला. या वेळी पालखी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. पालखी परतल्यानंतर सायंकाळपासून अभिषेक पूजेसह भजन, कीर्तन आदी कार्यक्रमांचे आयोजन मंदिर परिसरात करण्यात आले. भाविकांसाठी मोफत चहापान, फराळाचे पदार्थ आदींची व्यवस्था दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्थांकडून करण्यात आली. परिवहन महामंडळाने जादा बसेस सोडून भाविकांना प्रवास सुखद केला. कायदा-सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस फौजफाटा मोठय़ा प्रमाणावर तैनात करण्यात आला होता.