पर्वणीत तीन हजार बसगाडय़ांच्या १६ हजार फेऱ्या ल्ल रेल्वेने लाखो भाविक रवाना

कुंभमेळ्यातील दुसऱ्या पर्वणीत स्नानाचा योग साधल्यानंतर सोमवारी भाविकांचे जत्थे परतीच्या मार्गाला लागले असून काहींनी शिर्डी, वणी वा आसपासच्या अन्य धार्मिक स्थळांना भेट देण्यास प्राधान्य दिले. सकाळपासून जत्थे बाहेर पडू लागल्याने साधुग्राम सभोवतालचे प्रमुख मार्ग, पंचवटी व नाशिकरोड आदी भागात वाहतूक कोंडी झाली. नाशिकरोड रेल्वे स्थानकावर भाविकांची गर्दी झाली. कुंभमेळ्यासाठी सोडलेल्या विशेष रेल्वेगाडय़ांमधून सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत १ लाख ३० हजार भाविक रवाना झाले. एसटी महामंडळाच्या बसगाडय़ाही ‘हाऊस फुल्ल’ आहेत. पर्वणीच्या दिवशी तीन हजार बसगाडय़ांमार्फत तब्बल १६ हजार फेऱ्यांद्वारे प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. सोमवारी पुणे, मुंबई, शिर्डी, सूरत आदींसाठी जवळपास ३०० जादा बसेस सोडण्यात आल्या. पर्वणीला आलेल्या अनेकांनी शिर्डीला जाण्यास प्राधान्य दिले.
रविवारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे दुसऱ्या शाही पर्वणीत लाखो भाविक सहभागी झाले होते. अनेक भाविकांनी शाही स्नान झाल्यानंतर लगेचच परतीच्या प्रवासाला सुरूवात केली. यामुळे मध्यरात्रीपासून नाशिकरोड रेल्वे स्थानक व एसटी महामंडळाच्या स्थानकांवर गर्दी झाली. काही साधूग्राममध्ये साधू-महंतांच्या दर्शनासाठी थांबले. प्रवाशांच्या वाहतुकीचे दायित्व असणाऱ्या एसटी महामंडळाच्या तीन हजार बसेसने एकाच दिवसात तब्बल १६ हजार फेऱ्या मारल्याची माहिती विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली. पर्वणीच्या दिवशी अहोरात्र कार्यरत असणाऱ्या वाहकांना उत्पन्नाची माहिती सादर करण्यास दुसऱ्या दिवशी सायंकाळ लागली. परतणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने नियमित गाडय़ांबरोबर जवळपास ३०० जादा बसगाडय़ा सोडल्याचे जोशी यांनी नमूद केले. त्यात नाशिक-शिर्डी, नाशिक-सूरत, मुंबई व पुणे या गाडय़ांना भाविकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पहिल्या पर्वणीत फारसा प्रतिसाद न मिळाल्याने एसटी महामंडळाचे नियोजन कोलमडले होते. तेव्हाची कसर दुसऱ्या पर्वणीने भरून निघाली. कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न महामंडळाच्या तिजोरीत पडले.
नाशिकरोड रेल्वे स्थानकावर यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. सिंहस्थासाठी सोडलेल्या १५ विशेष गाडय़ांमधून पर्वणीनंतर सोमवारी सकाळी दहा वाजेपर्यंत एक लाख २९ हजार भाविक रवाना झाले. सकाळी या स्थानकावर हजारो भाविक रेल्वेची प्रतीक्षा करत होते. दुपारनंतर हे चित्र बदलले. आदल्या दिवशी जवळपास १० हजार वाहनांद्वारे आलेल्या काही भाविकांनी आसपासच्या तीर्थस्थळांना भेटी देण्याचे नियोजन केले. साधुग्राम व अन्यत्र थांबलेले भाविक सकाळपासून बाहेर पडू लागले. त्याचा परिणाम पंचवटीतील प्रमुख मार्ग, नाशिकरोड भागात वाहतूक कोंडी होण्यात झाला.
भाविकांचे जत्थे पायी मार्गक्रमण करत होते. काहींनी नाशिकहून त्र्यंबकला जाण्यास प्राधान्य दिले. त्र्यंबक येथे स्नान करणारे भाविकही नाशिकला येत होते. यामुळे सोमवारी साधुग्राम भाविकांनी फुलले होते.
चोरटय़ांचीही ‘पर्वणी’; ११ लाखांचे दागिने, रोकड, अन्य साहित्य लंपास
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यातील स्नानाचा योग साधण्यासाठी रविवारी आलेल्या भाविकांकडील मौल्यवान वस्तू, भ्रमणध्वनी संच लंपास करत चोरटय़ांनी वेगळ्या पध्दतीने पर्वणी साधल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस यंत्रणा बंदोबस्तात अडकली असताना चोरटय़ांनी भाविकांच्या वस्तू गायब केल्याचे दाखल गुन्ह्यांवरून लक्षात येते. पर्वणीच्या दिवशी चोरीचे एकूण १४ गुन्हे दाखल झाले. चोरीच्या सर्वाधिक घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या सर्व प्रकारांवरून चोरटय़ांनी ११ लाखांचा ऐवज लंपास केला. दुसऱ्या शाही पर्वणीसाठी देश-विदेशातील लाखो भाविकांची कुंभनगरीत तुडूंब गर्दी झाली. याआधी ध्वजारोहण सोहळा आणि पहिल्या पर्वणीला चोरटय़ांनी करामत दाखविली होती. त्याची पुनरावृत्ती दुसऱ्या पर्वणीला घडली. रामकुंडावर स्नानासाठी आलेल्या भाविकांकडील सोन्याची चेन, मंगळसूत्र, भ्रमणध्वनी अशा थोडय़ा थोडक्या नव्हे तर, आठ लाख ४० हजार रुपयांच्या मौल्यवान वस्तू गायब झाल्याच्या तक्रारी भाविकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात केल्या आहेत. महामार्ग स्थानकात बसमध्ये चढत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरटय़ांनी गायब केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साधूग्रामही चोरटय़ांच्या रडारवर होते. तपोवनातील ऋषी हिमाचल आखाडय़ातुन चोरटय़ांनी रोकड, भ्रमणध्वनी व कॅमेरा असा पावणे दोन लाखाचा ऐवज लंपास केला.
याच परिसरातील जयशंकर लॉन्सच्या बाजुला उभ्या असणाऱ्या इनोव्हा मोटारीची काच तोडून चोरटय़ांनी २० हजाराची रोकड व महत्वपूर्ण कागदपत्रे चोरली.