03 June 2020

News Flash

डिजे ऐवजी ‘ढोल-ताशा’

पारंपरिक वाद्ये व पर्यावरणस्नेही पध्दतीच्या वापरातून नाशिकच्या गणेशोत्सवाचे ब्रँडिंग करता येईल,

प्रतिनिधिक छायाचित्र

पोलीस आयुक्तांना गणेशोत्सव मंडळांचा सकारात्मक प्रतिसाद

शहरात काही रथी-महारथींची गणेशोत्सव मंडळे आहेत. परंतु, कायद्यासमोर सर्व समान आहेत. डिजे वापर व ध्वनि प्रदूषणाच्या मुद्यावरून गेल्या वर्षी गणेशोत्सवात ३८ गुन्हे दाखल झाले होते. याची जाणीव करून देत यंदा गणेशोत्सवात नाशिकची आगळीवेगळी ओळख निर्माण करण्यासाठी गणेश मंडळांनी कर्णकर्कश डिजे टाळून पारंपरिक ‘ढोल-ताशा’चा वापर करावा, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. त्यास गणेशोत्सवमंडळाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

पोलीस आयुक्तालयातर्फे सोमवारी दुपारी सार्वजनिक गणेशोत्सव आणि बकरी ईदनिमित्त शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी २०१६ मधील सवरेत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ढोल-ताशा पथके आणि अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीतील आदर्श मंडळांचा सत्कार करण्यात आला. आ. सीमा हिरे, भाजपचे शहराध्यक्ष आ. बाळासाहेब सानप, पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे, श्रीकृष्ण कोकाटे आदी उपस्थित होते. या वर्षीचा गणेशोत्सव प्रदूषणविरहित व पर्यावरणस्नेही पध्दतीने साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून पोलिसांनी चालविलेल्या प्रयत्नांची माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. दरवेळी गणेशोत्सव नियोजनाबाबत पोलीस व मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक होते. त्यात काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. परंतु यंदाच्या बैठकीचे स्वरुप वेगळे ठरले. मागील गणेशोत्सवात शांततेला गालबोट न लावणारे, पारंपरिक वाद्यांचा वापर करून ध्वनिप्रदूषण होणार नाही याची दक्षता घेणाऱ्या अन् पर्यावरणस्नेही पध्दतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांचा सत्कार करत पोलिसांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचा पायंडा पाडला.

मागील वर्षी शहरात २१३ मोठी, ६७१ छोटी आणि ३७ मौल्यवान अशा एकूण ९२८ सार्वजनिक मंडळांनी गणेशाची स्थापना केली होती. डिजेचा वापर करू नये अशा सूचना देऊनही काही मंडळांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी डिजेला परवानगी दिलेली नव्हती. यामुळे ध्वनि प्रदूषण केल्याच्या प्रकरणात गणेशोत्सवात ३८ गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले. डिजे, त्यावर वाजविली जाणारी विचित्र स्वरुपाची गाणी यामुळे उत्सवाचा रसभंग होतो. यंदा डिजेचा कोणी वापर करू नये म्हणून गेल्यावेळी डिजेचा वापर करणाऱ्या मंडळांसमवेत पोलिसांनी यंदा स्वतंत्रपणे बैठक घेतली. या शिवाय, धार्मिक उत्सव कशा पध्दतीने साजरे करावेत या बाबत धर्मगुरू आणि सामाजिक संस्थांसमवेत बैठका घेऊन चर्चा करण्यात आली. राज्यासह देशात नाशिक ढोल प्रसिध्द आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल-ताशाचा वापर केल्यास डिजेला कायमस्वरुपी प्रतिबंध घालता येईल.

पारंपरिक वाद्ये व पर्यावरणस्नेही पध्दतीच्या वापरातून नाशिकच्या गणेशोत्सवाचे ब्रँडिंग करता येईल, याकडे सिंगल यांनी लक्ष वेधले. पोलीस उपायुक्त (गुन्हे) विजय मगर यांनी गणेशोत्सवात गणेश मंडळांनी घ्यावयाची दक्षता याबद्दल माहिती दिली. रहदारीला अडथळा येणार नाही, अशी मंडप उभारणी, अधिकृत वीज जोडणी व जबरदस्तीने वर्गणी गोळा केली जाऊ नये, असे सूचित केले. प्रत्येक मंडळाने आवश्यक त्या परवानग्या घेणे बंधनकारक आहे. दिवसा व रात्री दोन स्वयंसेवकांची नेमणूक, गणपती मूर्तीच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरा, मंडळ पदाधिकाऱ्यांची यादी पोलिसांकडे देणे बंधनकारक आहे. विविध सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, राजकीय नेते, शांतता समितीचे सदस्य बैठकीस उपस्थित होते.

विसर्जन मिरवणूक सकाळी सुरू करण्याची सूचना

वाकडी बारव येथून शहराची मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होते. तिची वेळ साडे तीन वाजेची असली तरी ती कधीच वेळेत सुरू होत नाही. त्यात मानाच्या पाच गणपतीनंतर राजकीय नेत्यांशी संबंधित मंडळांचा क्रमांक असतो. विलंबाने सुरू होणारी मिरवणूक पुढे रेंगाळते. ठिकठिकाणी सामाजिक संस्था व राजकीय पक्षांकडून मंडळांचे स्वागत केले जाते. दोन मंडळांमध्ये मोठे अंतर पडते. या सर्वाचा फटका मिरवणुकीत मागे राहिलेल्या गणेश मंडळे व ढोल ताशा पथकांना बसतो. मुख्य मिरवणुकीतील विलंबामुळे अनेक गणेश मंडळे भाग घेणे टाळत आहेत. यामुळे कधीकाळी ७० ते ८० वर सहभागी होणाऱ्या मंडळांची संख्या आता ३० ते ४० वर आली आहे. सातपूर, पंचवटी, गंगापूर आदी भागात स्वतंत्रपणे मिरवणूक काढली जाते. असे सारे होऊनही मिरवणुकीतील कालापव्यय कमी झालेला नाही. बैठकीत याच मुद्यावर उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी बोट ठेवले. वास्तविक, गणेशोत्सवात सर्वाना सहभागी होण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. मुख्य मिरवणुकीतील विलंबामुळे मागील क्रमांकावरील अनेक मंडळे रात्री बारा वाजेपर्यंत वाकडी बारव येथे तिष्ठत बसतात. मिरवणुकीत अंतर पडणार नाही याचा प्रत्येक मंडळाने विचार करण्याची आवश्यकता आहे. मुख्य विसर्जन मिरवणूक दुपार ऐवजी सकाळी अकरा वाजता सुरू केल्यास हा प्रश्न सोडविता येईल. त्यासाठी सर्व मंडळांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2017 1:10 am

Web Title: dhol tasha replace dj during ganesh festival
टॅग Ganesh Festival
Next Stories
1 गोपीकृष्ण जयंती महोत्सवात ‘दी रिदॅमिक पॉईज’चा आविष्कार
2 आणखी दोन महिने कांद्याचे दर चढेच!
3 स्वातंत्र्यदिनी ‘नो साऊंड डे’
Just Now!
X