देश-विदेशातील ४३ महिलांना फसविले

नागरिकांच्या मनातील अस्वस्थतेचा फायदा घेऊन एका भोंदू वशीकरण बाबाने नाशिकसह देश-विदेशातील ४३ महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. शहर पोलिसांनी बाबा ऊर्फ पंडित रुधर शर्मा ऊर्फ नीरज भार्गव या वशीकरण बाबाला अटक केली आहे.

नाशिक शहर सायबर पोलिसांकडे पीडित महिलेने तक्रार केली होती. आपल्या खासगी आयुष्यातील मित्रांसोबतचे वाद सोडविण्यासाठी समाजमाध्यमाद्वारे पीडितेची वशीकरण बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंडित रुधर शर्माशी ओळख झाली. नाशिक येथील सिडको परिसरातील पत्त्यावर तो न सापडल्याने महिलेने भ्रमणध्वनीवर त्याच्याशी संपर्क साधला. आपल्या अडचणी सांगितल्या. त्या सोडविण्यासाठी शर्माने त्याच्या बँक खात्यावर सात हजार ५०० रुपये आणि वशीकरणाचे साहित्य घेण्यासाठी ४० हजार रुपये जमा करण्यास सांगितल्याचे या पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पीडित महिलेने ऑनलाइन ही रक्कम भरली. त्यानंतर शर्माने पुन्हा त्या महिलेशी संपर्क साधत वशीकरणाच्या कामात अडचणी येत असून अजमेर येथील खान बाबा याची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी त्याच्या खात्यावर दोन लाख ४० हजार रुपये भरण्यास सांगितले. महिलेने ही रक्कमही तातडीने भरली. खान बाबानेही पीडितेशी संपर्क साधत कामात अडचणी येत असून त्या सोडविण्यासाठी सहा लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले. एवढी रक्कम भरण्यास पीडितेने असमर्थता दर्शविली तेव्हा खान बाबाने पीडितेचे प्रियकरासोबतचे छायाचित्र आपल्याकडे असून पैसे न दिल्यास दोघांच्या आई-वडिलांच्या जिवाला धोका पोहचविण्याची धमकी दिली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडित महिलेच्या लक्षात आले.  या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित नीरज भार्गव (२३, रा. नवी दिल्ली) यास अटक केली. त्याच्या ताब्यातून तीन भ्रमणध्वनी, दोन डेबिट कार्ड जप्त केले. संशयित नीरज हा त्याच्या संपर्कात येणाऱ्या महिलांना व्हाईस मेंसेजरच्या माध्यमातून महिलांचा आवाज काढून संपर्क करत असे. तसेच पूजेच्या नावाखाली त्यांचे विवस्त्र छायाचित्र मागवत असे. त्याआधारे तो महिलांना धमकावत होता.