जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून बऱ्याच गावांच्या पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतींनी वीज देयक न भरल्यामुळे बंद पडल्या आहेत. काही पंचायतींच्या स्थानिक विहीरी आटल्यामुळे त्याही योजना बंद पडल्या आहेत. भूगर्भातील पाण्याची पातळी अतिशय खोल गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय भीषण झाला आहे. ग्रामस्थांना उन्हात सर्व काम धंदे सोडून पाणी कुठून मिळेल यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र धुळे तालुक्यात दिसत आहे.
साक्री तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शासनाने आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख हिलाल माळी यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली. त्यानुसार पालकमंत्र्यांनी युध्दपातळीवर धुळे तालुक्याची दुष्काळ आढावा व नियोजन बठक घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. धुळ्यासह साक्री तालुक्यातील पाणी समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी अक्कलपाडा धरणातील पाणी पांझरेत सोडण्याचे आदेश दिल्यामुळे पांझरा नदीच्या काठावर असलेल्या गावांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई आराखडा तयार केला आहे. आराखडय़ात उपाय योजना करण्यात येत असल्याचे म्हटले असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. पाणी टंचाई असलेल्या अनेक गावांचा उल्लेखच नाही. आराखडा तयार करतेवेळी संबंधित गावांमध्ये त्यावेळेस टंचाईची समस्या नसावी. धुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त २५ गावांना महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होतो. काही गावांना आठ ते १५ दिवसातून एकदा पाणी मिळते. साक्री तालुक्यात २१ गावे टंचाईग्रस्त आहेत. या दोन्ही तालुक्यातील ग्रामस्थांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. मे महिन्यात स्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
याआधी जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी टंचाईच्या घेतलेल्या बठकीत अंजग, कुंडाणे, वेल्हाणे, वारुळ, पथारे, बेहेड या काही गावांसाठी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु केला आहे. तसेच काही गावांसाठी तत्काळ पाणीपुरवठा योजना प्रस्तावित केल्या आहेत. उर्वरीत बहुसंख्य गावे तहानलेली आहेत. त्यामुळे संबंधीत गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न युद्ध पातळीवर सोडविणे गरजेचे आहे.