06 December 2019

News Flash

संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलांची वेगळी वाट

संस्थेच्या वतीने सध्या महिलांना आवडीनुसार प्रशिक्षण दिले जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

चारुशीला कुलकर्णी

बचत गटांतून महिलांची उद्योजक होण्याकडे वाटचाल

जागतिक एड्स दिन विशेष

दुर्धर आजारामुळे औषधावर होणारा खर्च.. नातेवाईकांनी फिरवलेली पाठ.. अकस्मात आलेल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या.. अशा विचित्र कोंडीत सापडल्यानंतर हे दृष्टचक्र भेदण्यासाठी त्यांनी कोणापुढे मदतीची याचना न करता स्वत:ची वेगळी वाट निवडली. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या महिलांच्या संघर्षमय प्रवासात यश फाऊंडेशनने पुनर्वसनाची जबाबदारी घेऊन त्यांना लघुउद्योजक होण्याकरिता प्रेरित केले. आज ५० पेक्षा अधिक महिला उद्योजकतेच्या वाटेवर आहेत.

काही वर्षांत एचआयव्ही, एड्सविषयी आरोग्य विभाग तसेच सामाजिक संस्थांकडून प्रबोधन होत असले तरी आजही या आजाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन विशेषत्वाने बदललेला नाही. आजही काही ठिकाणी त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते. त्यामुळे खचून गेलेल्या अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी यश फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे.

एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना मानसिक आधारासोबतच त्या घरातील महिलांना कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलता यावी यासाठी फाऊंडेशनने ‘पुनर्वसन’ प्रकल्प हाती घेतला. एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या, एड्स असणाऱ्या कुटुंबातील महिला सदस्यांना किंवा ज्या महिलांना हा आजार आहे अशा महिलांना एकत्र घेत संस्थेने त्यांचे बचत गट तयार केले. त्या अंतर्गत या महिलांना उद्योजक होण्यासाठी प्रेरित केले जात आहे.

संस्थेच्या वतीने सध्या महिलांना आवडीनुसार प्रशिक्षण दिले जात आहे. यात शिवणकामाला प्राधान्य दिले जात असून महिलांकडून हातमोजे, कापडी पिशव्या तयार करण्यात येत आहे. याशिवाय वेगवेगळ्या सण उत्सवानुसार कलाकृती करून दिल्या जात आहेत. महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी यासाठी फाऊंडेशन महिंद्राच्या माध्यमातून सक्रिय आहे. याशिवाय संस्थेच्या कार्यालयातच विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे.

या माध्यमातून महिलांना सात हजारांच्या आसपास मानधन मिळते. सण-उत्सवात कमाई प्रति दिवसांवर अवलंबून असते. महिला स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असल्याकडे फाऊंडेशनचे रवींद्र पाटील यांनी लक्ष वेधले. ग्राहकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.

बचत गटांतून उद्योगनिर्मिती

एचआयव्हीसह संघर्षमय जीवन जगणाऱ्या महिलांचा बचत गट निर्माण करण्यात आला आहे. त्यांची आवड, त्यांच्याकडे असणारा वेळ पाहता त्यांना फाइल तयार करणे, वारली चित्रकला, हातमोजे बनविणे अशा विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. काहींना आर्थिक साहाय्य देऊन लहान उद्योग करण्यास प्रेरित करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत संस्थेतील एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या महिलांचे पाच बचत गट असून ५६ महिला या बचत गटात सहभागी आहेत. याद्वारे या महिला आपल्यासारख्या गरजू महिलांना आर्थिक साहाय्य करीत आहेत. याशिवाय, त्यांच्या बालकांना सकस आहार योजनेसह अन्य समुपदेशन करण्यात येत आहे.

First Published on December 1, 2018 1:18 am

Web Title: different way for women who live in conflict situations
Just Now!
X