26 August 2019

News Flash

पक्क्या रस्त्यांअभावी पेठ तालुक्यात रुग्णसेवा, शिक्षणाच्या मार्गात अडचणी

आरोग्याचा प्रश्न बळावल्यास रुग्णाला डोलीतून १९ किलोमीटर अंतर पायी चालत घेऊन जावे लागते.

(संग्रहित छायाचित्र)

चारुशीला कुलकर्णी, नाशिक

गावातील एखादी व्यक्ती आजारी पडली की, १९ किलोमीटरची पायपीट ठरलेली. नातेवाईक, ग्रामस्थांना रुग्णाला डोलीतून न्यावे लागते. कारण वाहतूक व्यवस्था अतिशय तोळामासा आहे. तीन किलोमीटर पक्का रस्ता नसल्याने गावात शाळा असूनही शिक्षक फिरकत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना लगतच्या गावातील शाळेचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी दररोज काही किलोमीटरची पायपीट करावी लागते. रस्त्याअभावी पेठ तालुक्यातील कायरे, झरी, सावरला आणि बेहेडपाडा गट ग्रामपंचायतीतील काही ग्रामस्थांना अक्षरश: द्राविडी प्राणायाम करावा लागतो.

दुर्गम आदिवासी भागाचा विकास होण्यासाठी शासन प्रचंड खर्च करीत असले तरी मूलभूत सुविधा नसल्याने आरोग्य, शिक्षण सुविधेपासून आदिवासी बांधव दूर राहत आहेत. पेठ तालुक्यातील कायरे, झरी, सावरला, बेहेडपाडा ग्रुप ग्रामपंचायत हे त्याचे ठळक उदाहरण. मूलभूत सुविधांअभावी आरोग्य, शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. शासनाच्या काही विभागांमुळे सेवा-सुविधा पोहचविण्यास अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी होत आहेत. पेठ हा आदिवासी तालुका. त्यातील या ग्रामपंचायतीत बेहेडपाडय़ाची अवस्था वाळीत टाकलेल्या गावासारखी. परिसरात कुंभाळे हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे गाव, तर दहाडे या ठिकाणी दुसरे आरोग्य केंद्र आहे. हे अंतर जवळपास २४ किलोमीटर आहे. बेहेडपाडय़ाहून कुंभाळेकडे जाण्यासाठी कोणतीही वाहन व्यवस्था नाही. आपत्कालीन स्थितीत मोफत सेवा देणारी १०८ ची आरोग्य सेवा केवळ झरी गावापर्यंत आहे. आरोग्याचा प्रश्न बळावल्यास रुग्णाला डोलीतून १९ किलोमीटर अंतर पायी चालत घेऊन जावे लागते. त्यानंतर कुंभाळे येथे जाण्यासाठी खासगी वाहने उपलब्ध होतात.

झरी किंवा अन्य ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू असताना बेहेडपाडा येथे शाळा असूनही विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी जाण्याशिवाय पर्याय नाही. कारण, रस्ता नसल्याने शिक्षकांना जंगलातील पायवाट हा एकच पर्याय उरतो. या पर्यायाचा वापर शिक्षक करीत नाहीत. यामुळे गावातील विद्यार्थी दुसऱ्या गावातील शाळेत जातात. या स्थितीला वन विभागासह प्रशासकीय अनास्था कारणीभूत असल्याची तक्रार पुंडलिक सातपुते यांनी केली. झरीपासून बेहेडपाडा हे अंतर तीन किलोमीटर आहे. त्यात दोन नद्यांचा संगम झाला आहे. ही नदी पुढे बेहेडपाडय़ाला जाते. पावसाळा वगळता नदी पार करून दोन्ही गावांत ये-जा होत असते. जंगलातील पायवाट तुडवत जावे लागते. झरी-कुंभाळे दरम्यान पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याच्या कामास सुरुवात झाली होती. बेहेडपाडापासून कुंभाळेपर्यंत रस्ता व्हावा, याकरिता जिल्हा प्रशासनाकडे मागणी करूनही हा विषय प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे

जंगलातील पायवाट हाच आधार

बेहेडपाडाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने जंगलातील पायवाटेचा अवलंब करण्यास शिक्षकांसह इतर तयार नसतात. स्थानिक ग्रामस्थांना त्याशिवाय पर्याय नसतो. ये-जा करण्यासाठी तो मार्ग अनुसरला जातो. रस्ता नसल्याने शासकीय सेवा, वाहतूक, अन्य साधनांचा लाभ घेण्यास मर्यादा पडतात. गाव विकासापासून कोसो दूर राहिले आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने बेहेडपाडा ते कुंभाळेपर्यंत पक्का रस्ता करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

First Published on December 29, 2018 1:58 am

Web Title: difficulties in education hospital services in peth taluka due to lack of roads