महापालिकेतील स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची शिवसेनेची मागणी

नाशिक : शासन स्तरावर पदोन्नतीची कार्यवाही केली जात असताना महापालिका स्तरावर मात्र ती प्रलंबित ठेवली जाते. पदोन्नतीपासून वंचित राहिल्याने स्थानिक अधिकारी आणि कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. अनेक महत्वाच्या पदांवर पदोन्नतीने नेमणूका होत नसल्यामुळे तसेच सर्व नेमणूका प्रभारी कामकाज देऊन केल्या जात असल्याने महापालिकेच्या कामकाजात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार म्युन्सिपल कर्मचारी सेना आणि विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. शहराचे भूमीपूत्र असलेल्या महापालिकेतील स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने पदोन्नती देण्याची प्रक्रिया तत्परतेने करण्याचे आश्वासन दिले होते. शासन निर्णयानुसार पदोन्नतीची कार्यवाही किती दिवसांत पूर्ण होईल याची माहिती प्रशासन (उपआयुक्त) यांच्याकडे मागूनही दिली गेली नसल्याचा कामगार संघटनेचा आक्षेप आहे. मनपा स्तरावर पदोन्नतीची कार्यवाही प्रलंबित ठेवण्याचे कारण काय, असा प्रश्न कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे आणि विरोधी पक्षनेते बोरस्ते यांनी उपस्थित केला.

अनेक महत्वाच्या पदांवर पदोन्नतीने नेमणूका केल्या जात नाहीत. परिणामी, कामकाजात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ लाभ मिळून अनेक वर्ष झालेली आहे. मात्र वरीष्ठ स्तराचे वेतन घेऊनही कर्मचारी कनिष्ठ पदावरच काम करीत आहेत. यात मनपाचेही नुकसान होत आहे. वर्ग चारमध्ये अनेक कर्मचारी उच्चशिक्षित असून त्यांच्या शिक्षणाचा उपयोग हा मनपाच्या सेवेत होण्यासाठी संबंधितांना पदोन्नती मिळणे आवश्यक आहे.

मनपाची सेवा प्रवेश नियमावली अद्याप मंजूर नसल्याने पूर्वीच्या सेवा प्रवेश नियमावलीनुसार पदोन्नती  करावी, जेणेकरुन ज्या कर्मचाऱ्यांना कामाचा अनुभव आहे; मात्र मनपाच्या सेवेत पूर्णवेळ कार्यरत असल्यामुळे व नव्या नियमावलीबाबत अवगत केलेले नसल्याने ते वरीष्ठ पदाची शैक्षणिक अर्हता धारण करु शकत नाही अश्या कर्मचाऱ्यांना पूर्वीच्या सेवाप्रवेश नियमावलीनुसार ते त्या पदाची अर्हता धारण करीत असल्यास त्यांना मनपा सेवेचा अनुभव विचारात घेवून पदोन्नती द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.