News Flash

गुप्तधनाच्या लालसेपोटी त्रिंगलवाडी किल्ल्यावर खोदकाम

वृक्षवेलींसह फुलपाखरे, पक्ष्यांच्या सान्निध्यात बहरलेल्या इगतपुरीलगतच्या त्रिंगलवाडी किल्ल्यावर

दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानच्या स्वच्छता मोहिमेत प्रकार उघडकीस
वृक्षवेलींसह फुलपाखरे, पक्ष्यांच्या सान्निध्यात बहरलेल्या इगतपुरीलगतच्या त्रिंगलवाडी किल्ल्यावर गुप्तधनाच्या लालसेने ठिकठिकाणी खोदकाम करत किल्ल्याच्या मूळ सौंदर्याला बाधा आणली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविताना दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानच्या लक्षात हा प्रकार आला. किल्ल्यावरील अस्वच्छता, जीर्ण अवशेष, नैसर्गिक साधन संपत्ती यांचे जतन व्हावे, यासाठी वन विभाग व पुरातत्त्व विभागाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रतिष्ठानने केली आहे.
इगतपुरीपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर हा डोंगरी किल्ला असून पूर्वी कोकणातून देशावर येणारे व्यापारी तसेच सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तो महत्त्वपूर्ण भूमिका निभावत होता. समुद्रसपाटीपासून ३२३८ फूट उंचीवर असणारा हा किल्ला जैवविविधतेने नटलेला आहे. वनफुलांचे माहेरघर असलेल्या किल्ल्यावर फुलपाखरांच्या दहा जाती पाहावयास मिळतात. किल्ल्यावर चढाई करताना अनेक गोष्टी लक्षात आल्या. पायथ्याशी असलेल्या जैन लेणी लक्ष वेधून घेतात. या प्राचीन लेणीला मोठय़ा चिरा गेल्या असून, पुरातत्त्व विभाग व वन विभागाने लक्ष न दिल्यास दुर्घटना घडू शकते. तसेच या ठिकाणी काही समाजकंटकांनी गुप्तधन मिळते का, या लालसेने ठिकठिकाणी खोदकाम करत किल्ल्याच्या सौंदर्याला बाधा आणली आहे. किल्ल्यावर झाडांची संख्या कमी आहे. पर्यटक वा इतिहासप्रेमींना किल्ल्याची माहिती देणारे कोणतेही फलक लावलेले नाहीत. या परिसरात दुर्गसंवर्धन प्रतिष्ठानने स्वच्छता मोहीम राबविली. प्रतिष्ठानच्या सदस्यांनी तळी स्वच्छ करून मद्यपींनी केलेला कचरा उचलला. इगतपुरी गावातील ३० शालेय विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. संस्थेचे अध्यक्ष प्रा. आनंद बोरा यांनी गडाचा इतिहास, गडावरील पक्षी, फुले व वृक्षांची माहिती दिली. शाळेच्या सहली या किल्ल्यावर काढण्यात येणार असून, गडकि ल्ल्यांच्यापायथ्याशी असलेल्या गावांतील युवकांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बोरा यांनी सांगितले. किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन त्याच्या जतनासाठी पुरातत्त्व विभागाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी अजित जगताप, पक्षीमित्र उमेश नागरे, प्रा. कन्हैया चौरासिया, आशीष बनकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 9:17 am

Web Title: digging on tringalavadi fort
Next Stories
1 ‘स्मार्ट सिटी’च्या विषयांमुळे पालिका सभेत गदारोळ
2 नाशिकमध्ये जानेवारीत ‘महापेक्स २०१६’ फिलाटेली प्रदर्शन
3 चांदवडमध्ये सव्वा कोटींचा गांजा हस्तगत; दोघांना पोलीस कोठडी
Just Now!
X