जेवणासाठी भाजी पोळी मागण्याचे निमित्त करून घरातील पाच महिन्यांच्या मुलीला घरातून उचलून नेत शेत जमिनीतील विहिरीत फेकून तिची हत्या करणाऱ्या दोन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी तालुक्यात हा प्रकार घडला असून संशयित पोलिसांच्या हाती न लागल्याने बालिकेची हत्या करण्यामागील गूढ कायम आहे.

दिंडोरी तालुक्यातील दहेगाव शिवारात ज्ञानेश्वर मेधणे यांची शेतजमीन आहे. शेतजमिनीत त्यांचे वास्तव्य आहे. सोमवारी दुपारी १२ वाजता दोन जण मेधणे यांच्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ आले. त्यांनी घरात असलेल्या वंदना मेधणे यांच्याकडे जेवणासाठी भाजी-पोळी मागितली. वंदना या भाजी-पोळी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता संशयितांनी तेथे असलेल्या पाच महिन्यांच्या स्वरा मेधने या बालिकेस उचलले व बाहेर आणले. त्यांनी तेथे असलेल्या विहिरीत स्वराला जीवे मारण्याच्या इराद्याने फेकून दिले. दरम्यान भाजीपोळी घेऊन वंदना बाहेर आल्या असता संशयित दुचाकीवर बसून निघून गेल्याचे त्यांनी पाहिले. दोघांचे अचानक पसार होणे वंदना यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी स्वराचा शोध घेतला. मात्र ती आढळून आली नाही. त्यांनी तिचा परिसरात शोध घेणे सुरू केले. संशयावरून घरालगत असणाऱ्या विहिरीत डोकावले असता स्वरा आढळून आली.

यासंदर्भात पोलिसांनाही माहिती देण्यात आली. स्वराला विहिरीबाहेर काढून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून स्वराला मृत घोषित केले. नाकातोंडात पाणी गेल्याने स्वराचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष शव विच्छेदन अहवालात काढण्यात आला.

पोलीस उपअधीक्षक देवीदास पाटील, निरीक्षक अनंत तारगे, उपनिरीक्षक पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संवेदनशील बाब असल्याने स्थानिक गुन्हा शाखेची मदत घेऊन प्रकरणाच्या तळाशी जाणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी दिली. दरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सखोल चौकशीच्या सूचना दिल्याची माहिती देण्यात आली. ज्ञानेश्वर मेधणे यांच्या तक्रारीवरून दोन संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्पाप स्वराच्या हत्येचे कारण काय, याचीच चर्चा सध्या दिंडोरी तालुक्यात सुरू आहे.