बच्चू कडूंचा आरोप; दौऱ्यामुळे जिल्हा परिषदेत कडेकोट बंदोबस्त

अपंगांच्या प्रश्नांवरून काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्तांच्या अंगावर धावून गेलेले प्रहार संघटनेचे अध्यक्ष आ. बच्चू कडू यांची बुधवारची जिल्हा परिषदेतील भेटदेखील प्रशासनाला धास्तावणारी ठरली. कडू यांनी अपंगांच्या नोंदणीत व निधी वाटपात मोठा घोळ असल्याचा आरोप यावेळी केला. त्यावर पुढील काळात कार्यवाही न झाल्यास आंदोलन केले जाईल, असा त्यांनी इशारा दिला. दरम्यान, मागचा अनुभव लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

गेल्यावेळी कडू यांची महापालिका भेट वादळी ठरली होती. अपंगांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना काही विशिष्ट प्रमाणात निधी राखीव ठेवावा लागतो. संबंधितांच्या योजनांवर तो खर्च होणे अपेक्षित आहे. पालिकेतील आलबेल कारभारावरून कडू यांनी पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याकडे जाब विचारला. यावेळी उभयतांमध्ये शाब्दिक वाद झाले. तेव्हा कडू हे थेट आयुक्तांच्या अंगावर धावून गेल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून कडू यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. हा घटनाक्रम ताजा असताना जिल्हा परिषदेतील अपंगांसाठीच्या योजना व निधीचा आढावा घेण्याकरिता कडू हे बुधवारी जिल्हा परिषदेत दाखल झाले. कडू येणार म्हटल्यावर जिल्हा परिषद प्रशासन धास्तावले. पोलीस यंत्रणेने पालिकेसारखा काही प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. अपंग बांधवांसमवेत कडू यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मिना यांची भेट घेऊन चर्चा केली. बनावट अपंगांनी शिक्षकांच्या नोकऱ्या लाटल्याने खऱ्या अपंग बांधवांची संधी हिरावली गेली.

या विषयात महिनाभरात कारवाई करून अहवाल देण्याचे मान्य करण्यात आले. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात अपंगांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात जिल्ह्य़ात १३ हजार अपंग बांधव असल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा परिषदेकडील अपंगांचा निधी आजही अखर्चित आहे. मुख्यालयासह इतर ठिकाणी त्यांच्यासाठी लिफ्टची सुविधा केली नाही. दोन-तीन वर्षांचा अखर्चित निधी संबंधितांच्या योजनांवर खर्च करावा, अशी सूचना आ. कडू यांनी केली. या संदर्भात विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास आंदोलन केले जाईल, असे त्यांनी सूचित केले.

कांदा भाव पाडण्यासाठी व्यापाऱ्यांवर छापेमारी

अपंगांच्या नोंदणीत व निधी वाटपात मोठा घोळ असल्याचा आरोप कडू यांनी केला. त्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन छेडले जाईल. कांद्या व्यापाऱ्यांवर पडलेल्या छापेसत्रावर त्यांनी भाष्य केले. कांद्याचे भाव पाडण्यासाठी सरकारने जाणीवपूर्वक व्यापाऱ्यांवर छापे टाकले. मुंबई आणि दिल्लीत कांदा स्वस्त मिळावा यासाठी छापे टाकून हे भाव नियंत्रणात आणले गेल्याचा आरोप त्यांनी केला. भाजप सरकारला विरोधकांची धास्ती नाही. विरोधक सरकारच्या प्रेमात पडले आहे. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात राधाकृष्णाचे प्रेम असल्याचा टोला त्यांनी लगावला. बुलेट ट्रेन आणि समृद्धी महामार्गासाठी पैसे हवे म्हणून राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देत नसल्याची तक्रारही कडू यांनी केली.