शासकीय नियमाला आरोग्य संचालक कार्यालयाकडून केराची टोपली

अपंगांचा शासकीय कार्यालयातील वावर सहज सुलभ व्हावा, यासाठी शासकीय कार्यालये तसेच रुग्णालय परिसरात खास ‘उतार’ तयार करण्याच्या शासकीय नियमाला आरोग्य संचालक कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे. परिणामी, अपंगत्वाच्या दाखल्यासाठी येणाऱ्या अपंगांना कार्यालय परिसरात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

मागील वर्षी आमदार बच्चू कडू यांनी महापालिकेत येऊन अपंगांच्या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर जिल्हा प्रशासनाला काही अंशी जाग आली. महापालिकेनंतर जिल्हा परिषदेत अपंगांसाठी उतार तयार करण्यात आला आहे. नुकतीच महापालिकेने अपंग निधीतून ठिकठिकाणी ‘ऑडिओ लायब्ररी’ सुरू केली आहे. मात्र आरोग्य विभाग त्याबाबत अद्याप अनभिज्ञ आहे. आरोग्य संचालक कार्यालयाच्या मुख्य इमारत परिसरात अपंगांसाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कार्यालय आवारात तीन ते चार पायऱ्या असून त्या चढूनअपंगांना ये-जा करावी लागते. वास्तविक यासाठी स्वतंत्र उतार गरजेचा आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात अपंगत्वाची चाचणी झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मिळणाऱ्या अपंग प्रमाणपत्रात अपंगत्वाची अपेक्षित टक्केवारी नसेल तर अपंगाना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी ते आरोग्य संचालकांकडे अर्ज करत या विषयावर पुन्हा तपासणीची मागणी करतात. नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार आणि अहमदनगर या पाच जिल्ह्य़ांतून दिवसाकाठी आठ ते १० असे महिन्याकाठी ५० ते ६० अपंगांसाठीच्या रुग्णालयात अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी फेऱ्या मारतात. स्वतंत्र उतार नसल्याने पायऱ्या चढण्या-उतरण्याचे दिव्य त्यांना पार पाडावे लागते.

रुग्णालय परिसरात स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. त्यामुळे अपंगांना इमारतीच्या आडोशाला किंवा संदर्भ सेवा रुग्णालयातील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागतो. या पाश्र्वभूमीवर, अपंगांनी स्वतंत्र उताराचा रस्ता आणि स्वच्छतागृहाची व्यवस्था, पिण्याची पाणी मुबलक स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आरोग्य उपसंचालक कार्यालयात स्वतंत्र उतार आहे. मात्र अपंगांसाठी तयार केलेल्या उताराची उंची नियमानुसार नाही. त्याची दुरुस्ती लवकरच करण्यात येईल, असे डॉ. जिल्हा शल्य चिकित्सक, प्रभारी आरोग्य संचालक सुरेश जगदाळे  यांनी म्हटले आहे.

पाण्याची व्यवस्था कुलूपबंद

शालिमार येथील उपसंचालक कार्यालयाच्या आवारात कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्रपणे कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र या सुविधेचा वापर अधिकारी, कर्मचाऱ्यांशिवाय कोणी करू नये यासाठी नळाला कधी-कधी कुलूप लावण्यात येते. यामुळे येथे येणाऱ्या अभ्यांगतांना तसेच रुग्णालयात ये-जा करणाऱ्यांना भर उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते.