काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

शहरातील अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका हा रस्ता स्मार्ट करण्याच्या कामाची सुरुवात होऊन तीन महिन्यांचा कालावधी होत असताना त्याची अद्याप १० टक्केही प्रगती झालेली नाही. मेहेर सिग्नल ते सीबीएस मार्गावरील एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली आहे. त्यामुळे पादचारी, विद्यार्थी, व्यावसायिकांसह वाहनधारकांची प्रचंड गैरसोय होत आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे, विलंब होत असल्याबद्दल ठेकेदाराला दंड करावा, अशी मागणी भीमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याचे स्मार्ट सिटीअंतर्गत सुशोभीकीकरण करण्यात येणार आहे. या कामावर तब्बल १७ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. जून महिन्यात या रस्त्यावरील काही टप्प्याचे खोदकाम करण्यात आले. सीबीएस ते मेहेर यादरम्यानच्या एका बाजूकडून दुहेरी वाहतूक केली जात आहे. दुसऱ्या बाजूला शाळा, महाविद्यालय, गृहरक्षक दलाचे कार्यालय, हुतात्मा स्मारक, व्यापारी संकुले आहेत. या सर्वाना खोदलेल्या रस्त्यामुळे कमालीचा त्रास सहन करावा लागत असल्याकडे निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. रस्ता खोदून तीन महिने झाले असले तरी कामाची प्रगती झालेली नाही. या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, हे स्पष्ट झालेले नाही. पूर्वीच्या रस्त्यापेक्षा स्मार्ट रस्ता किती उंच करण्यात येणार आहे, या रस्त्याच्या बांधणीत वीज तारा, भुयारी गटार, जलवाहिनी जोडणी ही कामे केली जाणार आहेत की नाही, असे प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत. रस्त्याचे हे काम विहित मुदतीत पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. त्यात ठेकेदाराला अपयश आल्यास दंडात्मक कारवाई करण्याची मागणी संघटनेचे अविनाश आहेर, रंगा राव, संजय कुलकर्णी आदींनी केली आहे.