01 June 2020

News Flash

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गिरीश महाजनांना धारेवर धरले

ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

संग्रहित छायाचित्र

वीज देयक आणि जिल्हा बँकेच्या वसुलीस स्थगिती देण्याचे निर्देश

जिल्ह्य़ात अतीपावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या अंसतोषाला नुकसानीची पाहणी करण्यासाठी उशिराने जिल्ह्य़ात येणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांना तोंड द्यावे लागले. पीक विमा, गारपीटग्रस्तांना पैसे मिळण्यास झालेला विलंब, जिल्हा बँकेकडून वसुलीसाठी शेतजमिनींचे लिलाव करणे, अशा मुद्यांवरून महाजन यांना रविवारी शेतकऱ्यांनी धारेवर धरले. अखेरीस महाजन यांनी वीज देयक, जिल्हा बँकेची वसुली, शेत जमीन लिलावास त्वरित स्थगिती देण्याचे निर्देश दिले. तसेच गारपीटग्रस्तांसाठी असलेले १२ कोटी रुपये आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील, असा दिलासा दिला.

ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघात पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत द्राक्ष संघाचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकरी उभा राहूच शकत नसल्याने पंचनामे, नुकसानभरपाई या भानगडीत न पडता सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा उतारा कोरा करावा, अशी एकमुखी मागणी केली. याबाबत सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. पीक विम्याची अधिसूचना वेळेत न काढल्याने फळबागधारक संकटात सापडला. निव्वळ आश्वसन नको ठोस निर्णय द्या, अशी मागणी करत शेतकरी आक्रमक झाले होते.

द्राक्ष बागायतदार संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र बोराडे यांनी जिल्ह्य़ातील ८० हजार हेक्टरवरील द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले. सटाणा, कळवण भागातील ‘अर्ली’ द्राक्षबागा पूर्णपणे तयार झालेल्या असतांना शेतकऱ्यांच्या हातात आलेला घास हिरावला गेला. सद्यस्थितीत प्रत्येक द्राक्ष उत्पादकावर  हेक्टरी १२ ते १५ लाख रुपयांचे कर्ज आहे. याशिवाय द्राक्ष शेती आणि द्राक्ष निर्यात व्यवसायात जिल्ह्य़ात पाच लाख मजूर काम करतात. या सर्वावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. महसूल विभागाने पंचनामे सुरू केले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. विम्याचे धोरण निश्चित नाही. शेतकरी वाचविण्यासाठी सरसकट कर्जमाफी हाच एकमेव पर्याय असल्याचे बोराडे यांनी नमूद केले.

याप्रसंगी जिल्ह्य़ातील खासदार, आमदारांसह अशोक गायकवाड अरुण मोरे, कैलास भोसले आदींनीही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांना भीक मागण्याची वेळ येऊ  देऊ नका, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अनेक शेतकरी शासनाच्या धोरणाविरोधात संतप्त झाले होते. बैठकीस कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, माजी आमदार मंदाकिनी कदम, अनिल कदम, जगन्नाथ खापरे, कैलास भोसले, माणिकराव पाटील उपस्थित होते

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांवर आलेले संकट शब्दांपलीकडले असून ५० वर्षांत प्रथमच असा प्रसंग उद्भवला आहे. नाशिक जिल्ह्य़ासह विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, आदी सर्वच भागातील फळबागा, सोयाबीन, कपाशी, मका, बाजरी, केळी उद्ध्वस्त झाली आहे. या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून १० हजार कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद केली आहे. ही अंतिम मदत नाही. पंचनाम्यानंतर चित्र स्पष्ट झाल्यानंतर त्यावेळी सर्व मदत दिली जाईल. दोन दिवसातच द्राक्ष बागायतदार संघाच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बोलावली जाईल -गिरीश महाजन (पालकमंत्री,नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2019 2:00 am

Web Title: disadvantaged farmers girish mahajan akp 94
Next Stories
1 पावसाने झोडपल्यानंतर विमा योजनेची उपरती
2 बालशिक्षण परिषद समुपदेशन अभ्यासक्रम तयार करणार
3 उत्तर महाराष्ट्रात पावसाचे थैमान
Just Now!
X