News Flash

आपत्ती व्यवस्थापनाचे पाठ देण्यासाठी अनोखा प्रयोग

कोणतीही अनुचित घटना घडली की, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे बोट दाखविले जाते.

विद्यार्थी, शिक्षकांसाठी कृती आराखडा

कोणतीही अनुचित घटना घडली की, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे बोट दाखविले जाते. मात्र घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले तर.. या विचाराने प्रेरित होत महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था आणि स्थानिक सामाजिक संस्था यांनी एकत्र येत शालेय विद्यार्थी व शिक्षकांसाठी खास आपत्ती व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार केला आहे. शालेय स्तरावरील सर्व शक्यतांचा विचार करत शिक्षकांना याबाबत प्रशिक्षित केले जात असून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचावा यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
चेन्नई येथील पूरस्थितीने प्रशासकीय पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाचे वाभाडे काढले आहेत. अशीच स्थिती देशात कुठेही निर्माण होऊ शकते. मुळात आपत्ती येऊ नये, त्यात ती मानवनिर्मित असेल तर ती घडू नये, आलीच तर त्याची परिणामकारकता कमी व्हावी यासाठी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था प्रयत्न करत आहे. यासाठी ४० जणांचा खास चमू तयार करत अपघात घडला, मानवनिर्मित आपत्ती कोसळली, तर काय करता येईल यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. आपत्ती व्यवस्थापनाचे हे संस्कार शालेय स्तरावर व्हावे यासाठी संस्थेने खास ‘कृती आराखडा’ तयार केला असून त्यात शालेय विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते, शिक्षकांनी अशा आपत्कालीन स्थितीत त्यावर नियंत्रण कसे मिळवावे, त्यांना प्राथमिक उपचार कसे द्यावे याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये शाळेत असताना अचानक आग लागली, तर दरवाजाच्या दिशेने मोकळ्या आवारात येण्यापेक्षा खिडकीच्या बाजूने मोकळ्या हवेत येत श्वासोच्छ्वास घेणे, शाळेवर अतिरेक्यांनी ताबा मिळविल्यास काय करता येईल, एखाद्या मुलाच्या तोंडात रबर किंवा ‘च्युइंगम’ घशात अडकले अथवा नाकात किंवा कानात पेन्सिल घुसल्यास, एखाद्या मुलाला शॉक लागला तर, शाळेत बॉम्ब असल्याचा निनावी फोन आला तर, साप चावल्यास, खेळताना अचानक एखादा मुलगा बेशुद्ध झाला, पोषण आहार किंवा आहारातून विषबाधा झाली, तर अशा अनेक शक्यतांचा विचार करून आपत्कालीन स्थितीत काय उपचार कराव़े, त्याला मानसिक आधारासह अन्य मार्गदर्शन कसे करावे याबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचा यात अंतर्भाव आहे.
आपत्कालीन परिस्थितीत विचलित न होता ती परिस्थिती कशी हाताळावी यासाठी शिक्षकांना या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. प्रशिक्षित शिक्षक त्याचे प्रशिक्षण स्काऊट-गाईड, आरएसपी, राष्ट्रीय सुरक्षा योजना आदींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देतील. संस्था हे सर्व प्रशिक्षणमोफत स्वरूपात देणार आहे.
या संदर्भात शाळा व महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी रवींद्र मुळीक (८६९१०१०७७०), राजीव चोबे (९३३०११००२६), प्रवीण ठाकरे (९८६००३६१८८) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2015 9:21 am

Web Title: disaster management training
Next Stories
1 नाशिकमध्ये प्रथमच ‘क्युटिकॉन २०१५’ अधिवेशन
2 गुप्तधनाच्या लालसेपोटी त्रिंगलवाडी किल्ल्यावर खोदकाम
3 ‘स्मार्ट सिटी’च्या विषयांमुळे पालिका सभेत गदारोळ
Just Now!
X