गोदावरी नदीपात्रात १७ प्राचीन कुंडांबरोबर गोवर्धन, गंगापूर ते नाशिक या दरम्यान पात्रात ११ पुरातन तीर्थ असल्याचा दावा गोदाप्रेमी सेवा समितीने केला आहे. त्याबाबत बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर नाशिकमध्ये उल्लेख असून सरकारने त्यांची स्थान निश्चिती करावी. गॅझेटिअरमधील माहिती दिशा फलकाद्वारे देऊन धार्मिक, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी समितीने केली आहे.

काँक्रिटीकरणामुळे गोदावरी नदीपात्रातील १७ प्राचीन कुंडातील जिवंत पाण्याचे स्रोत लुप्त झाले. त्यांचे पुनरुज्जीवन करावे, या मागणीसाठी समितीचे संस्थापक अध्यक्ष देवांग जानी यांनी उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली होती. जानी यांनी गोवर्धन ते नाशिकदरम्यानच्या ११ पुरातन तीर्थाची माहिती घेतली आहे. पंचवटीतील अहिल्यादेवी होळकर पूल ते मुक्तेश्वर महादेवाच्या शिवलिंगापर्यंत १७ प्राचीन कुंडांच्या धर्तीवर गोवर्धन-गंगापूर ते नाशिकदरम्यानच्या पात्रात हे ११ पुरातन तीर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.

गोवर्धन, पितृ, गालव, ब्रह्म, ऋणमोचन, कण्व अथवा क्षुधा, पापनाशन, विश्वमित्र, श्वेत, कोटी आणि अग्नी या पुरातन तीर्थाबाबत ‘बॉम्बे प्रेसिडेन्सी गॅझेटियर नाशिक १८८३’ आणि ‘की टू नाशिक-त्र्यंबक १९४१’ या पुस्तकांत तीर्थाचा उल्लेख केला आहे. त्यांचे अस्तित्व सहजपणे लक्षात येण्यासाठी फलकांवर त्यांची माहिती द्यावी,अशी मागणी जानी यांनी केली आहे.