तिढा सोडविण्यासाठी सोमवारी बैठक
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किरकोळ स्वरूपात होणाऱ्या भाजीपाला विक्रीच्या मुद्दय़ावरून संबंधित विक्रेते आणि बाजार समिती यांच्यात नव्याने वाद उफाळून आला आहे. भाजीपाला कमी भावात घेऊन या ठिकाणी तो अधिक दराने व्यापारी किरकोळ स्वरूपात विक्री करत असल्याने या व्यवहारात शेतकरी नाडला जात आहे. या मुद्दय़ावर पणन मंडळाच्या सूचनेवरून बाजार समितीने संबंधितांना मज्जाव करण्याचा प्रयत्न केला असता व्यापाऱ्यांनी लिलावावर बहिष्कार टाकत कामकाज बंद पाडले. या पेचावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन संचालकांनी दिले. या संदर्भात सकारात्मक निर्णय न घेतल्यास बाजार समितीचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा व्यापारी संघटनेने दिला. या विक्रेत्यांमध्ये गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींचा समावेश असून त्यांच्यामार्फत समितीच्या कर्मचाऱ्यांना धमकावले जात असून समितीचे आवार त्यांच्यापासून मुक्त करण्यासाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करावे, अशी मागणी समितीने केली आहे.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवटीतील मुख्यालयात भाजीपाल्याचे लिलाव होतात. काही व्यापारी लिलावात भाजीपाला खरेदी करून त्याची सकाळी याच परिसरात शहरातील इतर किरकोळ विक्रेते आणि ग्राहकांना विक्री करतात. यामुळे सकाळी बाजार समितीच्या आवारात किरकोळ भाजीपाल्याचा भलामोठा व्यापार भरलेला असतो. कमी किमतीत शेतकऱ्यांकडून माल खरेदी करून जागेवर तो अधिक किमतीला विकला जात असल्याने या व्यवहारात शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचे लक्षात घेत पणन मंडळाने त्यावर प्रतिबंध घालण्याची सूचना केली आहे. या परिपत्रकाचा आधार घेऊन बाजार समितीने या परिसरात किरकोळ विक्री करणाऱ्यांना प्रतिबंध करण्याची तयारी सुरू केली. समितीने किरकोळ विक्रीवर आक्षेप घेतल्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी भाजीपाल्याच्या लिलावावर बहिष्कार टाकला होता. लिलाव होत नसल्याने कृषिमाल विक्रीसाठी आलेले शेतकरी संतप्त झाले. त्यांनी आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. त्या वेळी बाजार समितीच्या संचालकांनी मध्यस्थी करत उपरोक्त तिढय़ावर लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले.
या संदर्भात व्यापारी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी शेखर निकम यांनी बाजार समितीच्या प्रमुखांवर आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप केले. किरकोळ व्यापाऱ्यांकडून २०१३ मध्ये संबंधितांनी लाखो रुपये उकळले. आता समितीचे प्रमुख पणन मंडळाच्या परिपत्रक पुढे करत आक्षेप घेत आहे. मुळात आमच्याकडे समितीचा व्यापारी परवाना असून शेतकऱ्यांकडून जागेवर माल खरेदी करून त्याची शहरातील किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री केली जाते. प्रत्येक व्यापारी बाजार समिती देखभालीपोटी दर महिना दोन हजार रुपये शुल्क भरतो. असे असताना किरकोळ विक्रीला आक्षेप घेण्यास संघटनेचा विरोध आहे. बाजार समितीने पुढील सात दिवसांत सकारात्मक निर्णय न घेतल्यास लिलावावर बहिष्कार टाकून बाजार समितीचे कामकाज बेमुदत बंद पाडले जाईल, असा इशारा निकम यांनी दिला.
व्यापारी संघटनेच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे समितीचे सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. कारवाई होणार असल्याने असे बेछूट आरोप ते करत आहेत. बाजार समितीसाठी शेतकरी महत्त्वाचा घटक आहे. किरकोळ विक्रेते त्यांच्याकडून अत्यल्प दरात भाजीपाला खरेदी करत असल्याने शेतकरी त्रस्तावले आहेत. शेतकरी व ग्राहकाला किफायतशीर दरात कृषिमाल मिळावा यासाठी किरकोळ विक्री बंद करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. किरकोळ विक्रेते दबावतंत्राचा अवलंब करतात. त्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या व्यक्तींचाही समावेश असून त्यांच्यामार्फत समितीच्या कर्मचाऱ्यांना धमकावले जाते. किरकोळ विक्रेत्यांना प्रतिबंध करण्यासाठी समिती तीन महिन्यांपासून पोलीस बंदोबस्तासाठी पाठपुरावा करत आहे. तो अद्याप उपलब्ध झाला नसल्याने ही कारवाई पूर्णत्वास जाऊ शकली नाही. या विषयावर सोमवारी बैठक बोलावण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले. बाजार समिती आणि व्यापारी यांच्या वादात शेतकरी भरडला जाणार असल्याची चिन्हे आहेत.