नाशिकमधील स्थितीवर आदिवासी क्षेत्र आढावा समिती समाधानी

नाशिक : राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीच्या एक वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक दौऱ्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी या तालुक्यातील शिधापत्रिका वाटप परिस्थिती अत्यंत बिकट होती. अनेक आदिवासी कुटुंबांकडे शिधापत्रिका नसल्याने अन्नाच्या मूलभूत अधिकारापासून ते वंचित होते. परंतु, आता सदर भागाचा आढावा घेतला असता वर्षभरात एकूण ४४ हजार ४९१ वंचितांना शिधापत्रिका उपलब्ध झाल्याची माहिती मिळाल्याने राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीने समाधान व्यक्त के ले आहे.  समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी पुरवठा विभाग, महसूल यंत्रणा तसेच आरोग्य, महिला आणि बालविकास विभागाच्या समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जाहीर अभिनंदन केले.

भविष्यात येणाऱ्या करोनाच्या तिसऱ्या लाटेत प्रौढांसोबत लहान मुलांना करोनाचा अधिक धोका असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीचा तालुकावार आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी पालघर, ठाणे, आणि नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागाचा तालुकावार आढावा घेतला. या दौऱ्या दरम्यान मुलांना तसेच मातांना दिला जाणारा आहार, त्याचप्रमाणे मल्टीव्हिटॅमिन, जंतनाशक औषध, करोनाचे लसीकरण, जनजागृती तसेच याबाबत आरोग्य विभाग आणि प्रशासनाची असलेली तयारी आणि शिक्षण, पुरवठा विभागाचा आढावा घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर , पेठ, सुरगाणा, कळवण आणि दिंडोरी या तालुक्यांच्याआढावा घेतला. यावेळी पुरवठा विभाग आणि महसूल विभागाने वर्षभरात शिधापत्रिकांपासून वंचित असलेल्या एकूण ४४ हजार ४९१ लाभार्थ्यांंना शिधापत्रिका उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसीकर यांनी दिली. यावेळी समिती अध्यक्ष पंडित यांनी पुरवठा अधिकारी आणि सदर तालुक्यांचे तहसीलदार यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत त्यांचे जाहीर कौतुक केले.

आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, महिला बालविकास विभाग, गटविकास अधिकारी यांनी समन्वयाने केलेल्या कामामुळे कुपोषणाचे कमी झालेले प्रमाण, करोनावर नियंत्रण मिळविण्यात आणि लसीकरणाविषयी  मिळालेले मोठे यश, तसेच भविष्यात येणाऱ्या करोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणेने केलेल्या तयारीचे पंडित यांनी कौतुक केले. नाशिक जिल्ह्यातील वर्षभरात बदललेली परिस्थिती पाहून शासकीय जन सेवकांनी आणि श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांंनी एकत्रितपणे प्रत्येक कुटुंबाला अधिकार मिळवून दिला. शासनात अनेक अधिकारी आपली सेवा समर्पित भावनेने करतात, हे चित्र खूप आशादायी असल्याचे  विवेक पंडित यांनी सांगितले.