07 March 2021

News Flash

जिल्हा बँक थकबाकी वसुलीस सुरुवात

कळवणमध्ये ६५ लाखांची वसुली, ५० ट्रॅक्टर जप्त

कळवण तालुक्यात जिल्हा बँकेकडे कर्ज प्रकरण करून घेतलेले ट्रॅक्टर थकबाकी न भरल्याने जप्त करण्यात येत आहेत.  (छाया- डॉ. किशोर कुवर)

कळवणमध्ये ६५ लाखांची वसुली, ५० ट्रॅक्टर जप्त

थकबाकीमुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डबघाईस चालल्याचे लक्षात घेऊन बॅंकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी थकबाकी वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. त्याअंतर्गत कळवण तालुक्यात ६५ लाख रुपये वसूल करण्यात आले असून थकबाकीदारांकडील ५० ट्रॅक्टर जप्त करण्यात आल्याने तालुक्यातील थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.

जिल्हा बँकेच्या थकबाकीदारांमध्ये विविध कार्यकारी संस्थेच्या संचालकांची नावे समाविष्ट असतील तर अशा थकबाकीदार संचालकांविरुद्ध सहकार कायद्यान्वये अपात्र ठरविण्याचे प्रस्ताव सहकारी संस्था तालुका उपनिबंधकांकडे दाखल करण्याचे आदेश जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत. संचालकपद शाबूत ठेवण्यासाठी धावपळ उडाली असून त्यामुळे थकबाकी वसुली होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. आहेर यांनी कळवण तालुक्यातील थकबाकी वसुली करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाखांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कडक धोरण आखावे, काही अडचण आल्यास थेट आपल्याशी संपर्क साधावा, असा इशारा दिल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागात गावोगावी जिल्हा बँकेची थकबाकी वसुली पथके दिसू लागली आहेत.

कर्जाने घेतलेले ट्रॅक्टर जप्त करावेत आणि ट्रॅक्टर जागेवर नसल्यास संबंधित थकबाकीदारांवर गुन्हे दाखल करावेत, ज्या थकबाकीदार सभासदांच्या उताऱ्यावर जप्तीची नोंद असेल आणि ते सभासद कर्ज फेडत नसतील तर निबंधक कार्यालयात प्रकरण दाखल करावे, त्या प्रकरणाच्या निकालानंतर संबंधित थकबाकीदाराच्या सातबारा उताऱ्यावर जिल्हा बँकेचे नाव लागेल.

त्यामुळे ती मालमत्ता बँकेची होईल. ट्रॅक्टर कर्ज वसुलीसाठी गेल्यावर ट्रॅक्टर जागेवर न सापडल्यास पंचनामा करून थकबाकीदाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आल्याने कळवण तालुक्यात वसुली पथकाने ५० ट्रॅक्टर जप्त केले आहेत. त्यापैकी सात मालकांनी थकबाकी भरुन जिल्हा बँकेला सहकार्य केले असून उर्वरित ४३ ट्रॅक्टर मालकांना थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिड लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या लाभार्थ्यांनी उर्वरित रक्कम भरल्यास त्यांचेही कर्ज माफ होणार आहे. असे असतांना त्यांच्याकडून पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नसल्यामुळेही बॅँकेची वसुली होत नाही. त्यामुळे बॅँकेने आता वसुली मोहीम सुरू केली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलमान्वये अधिक थकबाकी असलेल्या सभासदांकडील जप्त केलेल्या मालमत्तांवर बँकेच्या नावाचा बोजा चढविण्याचे कामकाजही अनेक ठिकाणी प्रलंबित आहे. बोजा चढविल्यानंतर थकबाकी वसूल होण्यास मदत होईल, असा आशावाद आहेर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, बँकेचे संचालक धनंजय पवार यांनी थकबाकी वसुली पथकाने कळवण तालुक्यात अधिकाधिक वसुली करावी, आपण हस्तक्षेप करणार नाही, असे सांगितले.

वसुली करण्यात अपयशी ठरलेल्यांवर कारवाई करण्याबाबत बँकेचे अध्यक्ष आहेर यांनी सूतोवाच केले असल्याने वसुलीत कुचराई करणाऱ्यांविरुद्ध कारवाई झाल्यास आपली हरकत राहणार नसल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.

थकबाकीमुळे २३ सोसायटी संचालक अपात्र

देवळा तालुक्यातील १६ विविध कार्यकारी सोसायटय़ांच्या २३ संचालकांना कर्ज थकबाकीमुळे अपात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती साहाय्यक निबंधक एस. एस. गीते यांनी दिली आहे. सोसायटीच्या ४५ थकबाकीदार संचालकांकडून ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये थकबाकी वसूल करण्यात आल्याने त्यांच्यावरील अपात्रतेचे संकट टळले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. सहकार विभागाने देवळा तालुक्यातील सोसायटीच्या ६८ थकबाकीदार संचालकांना ३१ डिसेंबर २०१७ रोजी नोटीस काढली होती. तीन वेळा थकबाकीदार संचालकांना संधी देण्यात आली असता ४५ जणांकडून त्यांच्याकडे असलेली अल्पमुदत, मध्यम मुदत आणि पीक कर्ज थकबाकी ५५ लाख ५७ हजार ७१६ रुपये वसूल झाल्यामुळे त्यांचे संचालकपद कायम राहिले. उर्वरित २३ संचालकांकडून थकबाकी वसूल न झाल्याने त्यांचे संचालकपद रद्द करण्याचा आदेश साहाय्यक निबंधकांनी काढला. सहकार अधिकारी डी. एन. देशमुख यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. तालुक्यातील सोसायटी संचालकपद रद्द झालेले गावनिहाय संचालकांची संख्या पुढीलप्रमाणे- भिलवाड-तीन, गुंजाळनगर, शेरी वार्शी,फुले माळवाडी, देवळा आदिवासी सोसायटी, वाजगाव प्रत्येकी दोन, विठेवाडी, देवपूरपाडा, लोहणेर, खामखेडा, सरस्वतीवाडी, कुंभार्डे, तिसगाव, न्यू वासुळ, सांगवी, जे. डी. पवार सोसायटी भऊर प्रत्येकी एक याप्रमाणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2018 2:09 am

Web Title: district bank start recovers outstanding balance
Next Stories
1 ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेला गती
2 बचत गटांसमोर भांडवल उभारणीसाठी अडथळ्याची शर्यत
3 ..तर बेवारस वाहनांचा लिलाव
Just Now!
X