गरजेनुसार खासगी रुग्णालयांमध्येही करोना रूग्णांचे स्थलांतर 

नाशिक : जिल्ह्य़ात करोनासंदर्भात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास सज्जतेसाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजनाची आखणी केली आहे. कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

करोनाविषयी असणाऱ्या गैरसमजांकडे डॉ. जगदाळे यांनी लक्ष वेधले. करोना आणि स्वाइन फ्लू यांच्यातील लक्षणांमध्ये साम्य आहे. सर्दी, खोकला असलेल्यांनी त्याव्दारे विषाणू हवेत पसरू नये यासाठी वैद्यकीयदृष्टय़ा योग्य मास्क वापरावेत किंवा रुमाल बाळगावा. हातांच्या स्वच्छतेकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

प्रशासन वेगवेगळ्या निर्णयाच्या माध्यमातून गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असले तरी नागरिकांनी स्वत स्वच्छतेचा अंगीकार केला तर परिस्थिती नियंत्रणात राहील, असा दावा त्यांनी केला आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात करोना संशयितांवर उपचारासाठी विलगीकरण कक्ष करण्यात आला आहे. व्हेंटिलेटरसह अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रुग्णांवर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहोत. रुग्णांची संख्या वाढल्यास इगतपुरीजवळली एस.एम.बी.टी. वैद्यकीय महाविद्यालय, आडगांव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयासह काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्ण स्थलांतरीत करण्यात येतील. यासाठी वैद्यकीय संघटनांशी चर्चा झाल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

राज्य स्तरावरून जिल्हा रुग्णालयाला १० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला असून विभागीय निधीतून एक कोटीहून अधिक निधी उपलब्ध होत असल्याने रूग्ण तसेच वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक औषधे, मास्क तसेच अन्य साहित्य मुबलक स्वरूपात उपलब्ध करून घेण्यात येईल. नागरिकांनी भीती न बाळगता सजगता बाळगा, असे आवाहन डॉ. जगदाळे यांनी केले.

अखेर ओझर विमानतळावर प्रवासी तपासणीसाठी पथक

विदेशातून आणि बाहेरगावहून येणारे पर्यटक तसेच प्रवाशांची माहिती आरोग्य विभागाला देणे बंधनकारक आहे. बस स्थानक परिसरात अशी तपासणी अनिवार्य असतांना याबाबतचे अहवाल जिल्हाधिकारी तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्याचा आदेश आहे. या आदेशानुसार कारवाईविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे नाशिकपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ओझर विमानतळावरून प्रवाशांची कुठल्याही प्रकारची आरोग्य तपासणी  होत नव्हती. याविषयी चर्चा सुरू झाल्याने अखेर आरोग्य विभागाला जाग आली. बुधवारी सकाळी निफाड ग्रामीण रुग्णालयाचे एक पथक ओझर विमानतळावर दाखल झाले. याठिकाणी ‘थर्मल सेन्सर’ च्या माध्यमातून प्रवाश्यांची तपासणी करण्यात येत आहे.

व्हेंटिलेटरची व्यवस्था

जिल्हा शासकीय रुग्णालयाला आवश्यक दर्जा नसल्याने केवळ चार व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. करोनाचा फैलाव झाल्यास रुग्णांना श्वसनास अडथळा येऊ नये यासाठी महापालिकेचे सहा, खासगी रुग्णालयाचे १५, सरकारकडून पाच आणि पुन्हा नव्याने पाच याप्रमाणे एकूण ३५ व्हेंटिलेटरचे नियोजन जिल्हा रुग्णालयाने केले आहे. याशिवाय वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी तांत्रिकदृष्टय़ा आवश्यक हाजमोजे, गॉगल, कॅप, मास्क, गाऊन, प्लास्टिक बूट आणि अन्य साहित्य असे संच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांचे आवश्यक प्रशिक्षण घेण्यात आले आहे.

जिल्हा रुग्ण कल्याण समितीचा आक्षेप

जिल्हा शासकीय रुग्णालयाचा सेवा सुविधा असल्याचा दावा म्हणजे केवळ फसवणुक आणि दिशाभूल आहे. रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग दुरूस्तीच्या नावाखाली सहा महिन्यांपासून बंद आहे. तो ‘आपत्कालीन’ मध्ये स्थलांतरीत करण्यात आला असून या ठिकाणी केवळ आठ खाटा आहेत. ७०० खाटांच्या रुग्णालयात अतिदक्षतासाठी केवळ आठ खाटा हे वास्तव आहे. तसेच रुग्णालयातील सीसीटीव्ही कार्यान्वित नाही. पिण्याचे पाणी या ठिकाणी नाही. याविषयी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून आवाज उठविण्याचा प्रयत्न केला किंवा बैठक बोलावण्याची मागणी केल्यास केवळ आश्वासनांवर समिती सदस्यांची बोळवण होते.  अशा स्थितीत करोनाशी रुग्णालय व्यवस्थापन कसे तोंड देणार?

– गणेश कांबळे  (सदस्य, जिल्हा रुग्ण कल्याण समिती)