महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा परिषद माध्यमिक विभागाच्या सहकार्याने तसेच येथील संदीप अभियांत्रिकी आणि जिल्हा विज्ञान अध्यापक संघ यांच्या वतीने ११ ते १३ जानेवारी या कालावधीत येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन संदीप फाऊंडेशनमध्ये सोमवारी सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंभळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षपदी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. संदीपकुमार झा असतील.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांसह शिक्षण उपसंचालक भगवान सूर्यवंशी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव आर. आर. मारवाडी आदी उपस्थित राहणार आहेत. विज्ञान प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फाऊंडेशनतर्फे बसगाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे, आर. एस. मोगल, प्राचार्य प्रशांत पाटील यांनी केले आहे.