सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी कार्यवाह तथा मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेचे नाशिक विभागाचे अध्यक्ष दिवाकर कुलकर्णी (७६) यांचे नैनिताल येथे निधन झाले. आणीबाणीच्या काळात अतिशय महत्वाची भूमिका बजावणारे स्वयंसेवक म्हणून ते ओळखले जात. नैनिताल येथे योग शिबिरासाठी गेले असताना ही घटना घडली.

शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देणारे कुलकर्णी हे पेशाने शिक्षक. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या नांदगाव संस्थेतून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यवाहपदाची धुरा त्यांनी सांभाळली. लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ तसेच मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण संस्थेच्या नाशिक विभागाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. मुलींना सैनिकी शिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विद्यालयाची सुरूवात करण्याचा त्यांनी आग्रह धरला. त्यातून मुलींसाठी स्वतंत्र भोसला सैनिकी स्कूलची मुहूर्तमेढ रोवली गेली. शहरात संघ कामाच्या वाढीत त्यांचा सहभाग होता. आणीबाणीच्या विरोधातील आंदोलनात नाशिकरोड कारागृहात राज्यातील १२०० हून अधिक कार्यकर्ते व स्वयंसेवकांना अटक झाली होती. या सर्वाशी संपर्क व निरोपांची देवाणघेवाण या बरोबरीने आणीबाणीच्या विरोधातील सत्याग्रहाचे नियोजन आणि कार्यवाही याची जबाबदारी त्यांनी भूमिगत राहून पार पाडली. शहरातील क्रीडाभारती व विद्याभारती संस्थांची त्यांच्या पुढाकारातून उभारणी झाली. विद्या भारती पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. राम जन्मभूमी आंदोलनातील एकात्मता यात्रेचे ते नाशिकचे संयोजक होते.