X
निवडणूक निकाल २०१७

दिवाळीआधीच फटाक्यांवर निर्बंधांचा बार

शहर परिसरात दीपोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो.

१० हजार फटाक्यांपेक्षा अधिक लांबीच्या फटाके माळीला प्रतिबंध, आपटबार व उखळी दारू उडविण्यास मनाई.. दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्तालयाने नियमावली जाहीर केली आहे. ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी चार मिटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत कोणत्याही आवाजाचे फटाके उडविता येणार नाही. विक्रेत्यांना १८ वर्षांखालील मुलांना ज्येष्ठ व्यक्ती सोबत असल्याशिवाय फटाके विक्री करता येणार नसल्याचे सूचित करण्यात आले आहे.

शहर परिसरात दीपोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. या काळात मोठय़ा आवाजाचे फटाके उडविण्यामुळे निर्माण होणारे ध्वनी व हवा प्रदूषणाचा नागरिकांवर होणारे संभाव्य अपायकारक परिणाम टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे निर्बंध घालण्यात आले आहे. या संदर्भातील अधिसूचना पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी प्रसिद्ध केली.  आदेशाचा भंग केल्यास कारवाईचा इशारा सिंगल यांनी दिला आहे.

नियमावली

साखळी फटाक्यात एकूण ५०, ५० ते १०० आणि त्यावरील फटाके असतील तर आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या अंतरापासून चार मिटर अंतरापर्यंत ११५, ११० आणि १०५ डेसीबल इतकी असावी. शांतता क्षेत्रात कोणत्याही फटाक्यांचा वापर कोणत्याही वेळेत करता येणार नाही. विक्रेते व नागरिकांना परदेशी फटाके किंवा विक्री करण्यास प्रतिबंध आहे. फटाके विक्रेत्यांची दुकाने जमिनीलगत असावी. परवानाप्राप्त प्रत्येक स्टॉलमध्ये १०० किलोग्रॅम फटाके व ५०० किलोग्रॅम शोभेचे फटाके यापेक्षा अधिक साठा ठेवता येणार नाही. तसेच प्रत्येक स्टॉलमध्ये तीन मीटरपेक्षा कमी अंतर नसावे. एकापेक्षा अधिक स्टॉल असतील तर त्याचे प्रवेशद्वार समोरासमोर नसावे. एका ठिकाणी ५० पेक्षा अधिक स्टॉल उभारता येणार नाही. स्टॉलच्या ठिकाणी वीज पुरवठय़ाची वायरिंग विद्युत निरीक्षकाकडून प्रमाणित करावी लागणार आहे. कोणत्याही अपघातास तोंड देण्यासाठी योग्य ती सुरक्षा व्यवस्था आणि अग्निप्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक आहे. खराब स्थितीतील फटाक्यांची विक्री न करण्याची काळजी विक्रेत्यांनी घ्यावी, असे सूचित करण्यात आले. रॉकेटचा अग्रभाग हा १० सेंटिमीटरपेक्षा अधिक लांबीचा नसावा व २.५ सेंटिमीटरहून अधिक जाडीचा व्यास नसावा. १८ वर्षांखालील मुलांना त्यांच्यासोबत ज्येष्ठ व्यक्ती असल्याशिवाय फटाके विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.

First Published on: September 30, 2017 3:06 am
Outbrain