News Flash

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत खरेदीला उधाण

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले होते.

नाशिक महापालिकेत लक्ष्मीपूजन करताना महापौर रंजना भानसी व पोपटराव भानसी यांच्यासह परिवार.

घर-दुकानांसमोर रेखाटलेली आकर्षक रांगोळी.. दारावर फुलांचे तोरण.. पणत्यांनी प्रकाशमय झालेले अंगण.. धनासह चोपडय़ा, खतावण्या व यंत्रसामग्रीच्या पूजनाची लगबग.. आणि या सर्वाच्या जोडीला विविधरंगी फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत.. प्रकाशोत्सवातील लखलखीतपणा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी खऱ्या अर्थाने अनुभवयास मिळाला.  व्यापारीवर्गाने दुपारी तर नागरिकांनी सायंकाळी घरोघरी विधिवत लक्ष्मीपूजनास प्राधान्य दिले. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधत बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले होते.

दीपावलीच्या सुरुवात सोमवारपासून मोठय़ा उत्साहात सुरू झाली. तत्पूर्वी दिवाळीच्या आनंदाने वातावरण मंगलमय झाले होते. सोमवारपासूनच प्रत्येक दिवस मुहूर्ताचा मानून बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नाशिककरांची झुंबड उडाली आहे. पावसामुळे रखडलेल्या खरेदीला लक्ष्मीपूजनाच्या पाश्र्वभूमीवर, अक्षरश: उधाण आले. या दिवसाचे महत्त्व व्यापारी व व्यावसायिकांसाठी अधिक असते. त्यांच्यामार्फत दुकान व कार्यालयांना फुलांनी सुशोभित करण्यात आले. नागरिकदेखील फुलांची सजावट करण्यास मागे नव्हते. झेंडूच्या फुलांसह मोगरा व शेवंतीला चांगली मागणी होती. लक्ष्मीपूजनच्या दिवशी घराघरांत केरसुणीला लक्ष्मीच्या स्वरूपात पुजले जाते. फुलांबरोबर केरसुणी, पूजेसाठी लागणारे बोळकी खरेदीला ग्राहकांची गर्दी उसळली.

खरेदीसाठी लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त साधण्याचा अनेकांचा प्रयत्न होता. सराफ बाजार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन दुकानांमध्ये आगाऊ नोंदणी झाली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही वस्तुरूपी लक्ष्मी घरी नेण्याची धावपळ सुरू होती. सराफ बाजारात गर्दी असली तरी वर्षभरापासून दाटलेले मंदीचे मळभ पूर्णपणे दूर झाले नाही. या मुहूर्तावर पेशवाई, पारंपरिक पद्धतीच्या दागिन्यांची खरेदी झाली. चोख सोन्यापेक्षा ग्राहकांनी दागिन्याला अधिक प्राधान्य दिल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले. फटाक्यांमुळे ध्वनी व हवेतील प्रदूषणाबाबत ओरड होत असली तरी बच्चे कंपनीच्या आग्रहामुळे खरेदीचा उत्साह कायम राहिला.

ग्राहकांच्या गर्दीने फुललेल्या बाजारपेठेतील गर्दी दुपारनंतर हळूहळू कमी होऊ लागली. व्यापारी व व्यावसायिकांसाठी लक्ष्मीपूजनाची जय्यत तयारी आधीच केली होती. सकाळपासून फुलांनी सजविलेली दुकाने सायंकाळी दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाली. वर्षभराचा जमा-खर्च मांडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खतावण्या, चोपडय़ा यांच्याबरोबर धनाचे विधिवत पूजन करण्यात आले. कारखाने, बँका, व्यापारी आस्थापना, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी यंत्रसामग्रीचे विधिवत पूजन करण्यात आले. नाशिक महापालिकेत कोषागारातील तिजोरीचे महापौर रंजना भानसी, पोपटराव भानसी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या वेळी उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती  शिवाजी गांगुर्डे आदी उपस्थित होते. लक्ष्मी पूजनासाठी लाभलेला मुहूर्त साधण्याकडे प्रत्येकाचा कल होता.

घरोघरी केरसुणीची लक्ष्मीच्या स्वरूपात पूजा करण्यात आली. पूजन झाल्यानंतर बालगोपाळांसह थोरामोठय़ांपर्यंत सारेच फटाके उडविण्यात मग्न झाले. प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते दहा हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने आवाजाने हा परिसर दुमदुमून गेला होता. निवासी भागात आवाजापेक्षा फॅन्सी प्रकारांना पसंती मिळाल्याचे पाहावयास मिळाले. सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, ब्रेक व पिकॉक डान्स, व्हीसल व्हीज् अशा विविध फॅन्सी प्रकारांची आकाशात जणू परस्परांशी स्पर्धा सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

ध्वनिप्रदूषणाचे मापन

दिवाळीच्या कालावधीत आवाजाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ध्वनी पातळी मोजण्याचे काम हाती घेतले आहे. या काळात रात्री बारा ते सकाळी सहा या कालावधीत फटाके बंदी आहे. परंतु, त्याचे उल्लंघन होताना दिसते. ध्वनीची पातळी सर्वसाधारणपणे ५५ ते ६० डेसिबलपर्यंत असते. शहरातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या कारणांमुळे या पातळीत चढ-उतार होतो. अधिकाधिक ८० डेसिबलपर्यंतचा आवाज सहन केला जाऊ शकतो. त्या पुढील तीव्रतेचा आवाज मात्र सहन करण्यापलीकडे जातो. दिवाळीत फटाक्यांमुळे ही पातळी १०० डेसिबलच्या पुढे जाऊ शकते. फटाक्यांच्या प्रकारानुसार ११० ते ११५ डेसिबलपर्यंतच्या आवाजास शासनाने संमती दिली आहे. दरवर्षीप्रमाणे शहरातील प्रमुख ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाचे ध्वनिमापन करण्यात येणार आहे. लक्ष्मीपूजन व तत्सम दिवशी प्रमुख बाजारपेठांमध्ये पाच ते दहा हजारांच्या माळांवर अधिक भर असल्याने हा परिसर आवाजाने दुमदुमून जातो. निवासी भागात आवाजापेक्षा ‘फॅन्सी’ प्रकारांना पसंती दिली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:24 am

Web Title: diwali 2017 laxmi pujan 2017 2
Next Stories
1 समृद्धीबाधित गावांमध्ये काळी दिवाळी
2 ..तरीही कर्जाचे दुष्टचक्र
3 प्रवाशांसह चालक-वाहकांचेही हाल
Just Now!
X