विविध ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन

दीपावलीनिमित्त विविध रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे तो, दिवाळी पहाट, दिवाळी पाडव्याला आयोजित मैफलींनीं. नेहमीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमांसाठी विविध सार्वजनिक मंडळे, संस्था आणि संघटनांनी पुढाकार घेतल्याने ही पहाट खऱ्या अर्थाने सूरमयी होणार आहे. दिवाळीतील पाडवा पहाट आणि संगीताची मैफल हे काही वर्षांत अतूट बनलेले नाते यंदा अधिक दृढ होणार आहे.

नाशिकच्या सांस्कृतिक क्षितिजावर दरवर्षी अविस्मरणीय पाडवा पहाट फुलविणाऱ्या प्रमोद महाजन उद्यानात ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची मैफल गुरुवारी पहाटे पाच वाजता रंगणार आहे. भावगीत, भजन, गझल, होरी, चित्रपट गीते आदींचा आनंद मैफलीत मिळणार आहे. संगीत विश्वात फेणाणी यांनी स्वत:च्या गायन शैलीने स्वतंत्र ठसा उमटविला आहे. फेणाणी यांचा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर विशेष अभ्यास आहे. पंडित जसराज यांच्याकडे त्यांनी संगीताच्या अभ्यासाला सुरुवात केली. सारंगीसाठी त्यांनी पंडित राम नारायण यांचे मार्गदर्शन घेतले. संगीत क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात ही मैफल होणार असून नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजिका आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले आहे.

नसती उठाठेव मित्र परिवारच्या वतीने या वर्षी पंडित अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या अंजना नाथ यांच्या गायनाच्या कार्यक्रमाने बुधवारी पहाटे साडे पाच वाजता गंगापूर रस्त्यावरील नरसिंग नगर परिसराची ‘दिवाळी पहाट’ सजणार आहे. तबल्यावर अजिंक्य जोशी तर हार्मोनियमवर सुभाष दसककर साथसंगत करणार आहेत. अंजना नाथ या उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्या गायकीचा समृद्ध वारसा जपणाऱ्या गायिका म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण मीरा बॅनर्जी आणि पंडित ललित मोहन यांच्याकडे झाले. हे दोघेही बडे गुलाम अली खान यांचे शिष्य असल्याने त्यांना समृद्ध अशा गायिकीचे संस्कार गुरूमार्फत प्राप्त झाले. त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा मनोविज्ञान आणि शरीरविज्ञान या विषयावर प्रबंध सादर करून शिष्यवृत्ती मिळवली आहे. त्यांना ठुमरी गायकीसाठी श्रीमती गिरजादेवी पुरस्कार आणि ख्याल गायकीसाठी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मंडळाचे यंदाचे हे १६ वे वर्ष असून याआधी अजित कडकडे, राजाभाऊ काळे, शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, राम देशपांडे, रतनमोहन शर्मा, भुवनेश कोमकली, प्रसाद खापर्डे आणि विजय कोपरकर आदींनी या मंडळाची दिवाळी पहाट सजविली आहे. रसिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष बापू कोतवाल यांनी केले आहे.