वैद्यकीय व्यवसाय सुरू करताना भागिदारीत भांडवल उभे केले. त्यातून खरेदी केलेली साधनसामग्री भागीदाराची परवानगी न घेता परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राणेनगर परिसरातील शिवा कॉम्प्लेक्स येथे डॉ. अब्दुल रऊफ कुरेशी आणि डॉ. जौर अहमद यांनी एकत्र येत २०१४ मध्ये ‘न्यू सनशाईन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल’ सुरू केले. यासाठी डॉ. रऊफ यांनी १३,५०,००० रुपयांची गुंतवणूक केली तर डॉ. जौर याने ७,५०,००० रुपये हॉस्पिटलमधील फíनचर यासह अन्य साधनसामग्रीसाठी खर्च केले. मात्र अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने किंवा अंतर्गत वादामुळे डॉ. जौर याने रऊफ यांची परवानगी न घेता हॉस्पिटलमधील सर्व सामग्री २०१५ मध्ये न्यू सुविधा मल्टी स्पेशालिटी यांना ५० ते ६० लाख रुपयांना विकली, असे तक्रारीत म्हटले आहे. ही सर्व रक्कम व्यवसाय भागीदारीत असतानाही स्वत:च्या खात्यावर जमा केली. याबाबत डॉ. रऊफ यांनी संशयिताकडे वेळोवेळी पाठपुरावा करत भागीदारीप्रमाणे गुंतवलेल्या पैशाची मागणी केली. मात्र जौर यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने अखेर डॉ. रऊफ यांनी पोलीस ठाणे गाठले. जौर याच्याविरोधात अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विश्वासघात व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक झाली नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.