प्रसूतीदरम्यान उपचार करण्यात हलगर्जीपणा केल्यामुळे विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत त्यास संबंधित डॉक्टरला जबाबदार धरून त्याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मृत विवाहितेच्या नातलगांनी घोटी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
इगतपुरी तालुक्यातील आडवण येथे माहेर असणाऱ्या सुनीता पुनाजी सराई या बाळंतपणासाठी आल्या होत्या. प्रसूतीसाठी आई-वडिलांनी त्यांना घोटीच्या डॉ. बांगर यांच्या रुग्णालयात दाखल केले
होते. मात्र डॉक्टरांनी महिलेची प्रकृती गंभीर असल्याने सुलभ प्रसूती होणार नसल्याचे सांगत तिला दवाखान्यात ठेवावे लागेल, असे सांगितले. त्यानुसार सुनीता १४ दिवस रुग्णालयात दाखल होत्या. १७ तारखेला तिची सुखरूप प्रसूती झाल्यानंतर तिला उलटय़ा होऊ लागल्या. यामुळे घोटीतील अन्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तिथेही प्रकृती गंभीर झाल्याने तिला परस्पर नाशिकच्या खासगी रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेण्यात आला.
नाशिककडे येत असताना विवाहितेचा रस्त्यात मृत्यू झाला. मात्र संबंधित रुग्णालयात अतिदक्षता विभागात तिला दाखल करून घेण्यात आले आणि बिल उकळण्यात आले. दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले नसल्याचे लक्षात आले. मृत विवाहितेचा पती पुनाजी सराई याने घोटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
दरम्यान, महिलेवर उपचार करताना हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातलगांनी केला असून केवळ देयकाच्या हव्यासापोटी आणि लूट करण्याच्या हेतूने १४ दिवस रुग्णालयात बळजबरीने दाखल केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून संबंधित डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
घोटी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह नातेवाईकांनी निवेदन दिले. आदिवासी म. ठाकूर समाज संघटना आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा मेंगाळ यांनी दिला.