सलग दुसऱ्या दिवशीही रुग्णांचे हाल

डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांवर त्वरित उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक शाखेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात संघटनेचे पदाधिकारी, डॉक्टर, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सहभागी झाले. मोर्चामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. दरम्यान, डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे सलग दुसऱ्या दिवशीही हाल झाले. खासगी डॉक्टरांच्या वैयक्तिक संबंधातून तपासणी करण्याकडे रुग्णांनी लक्ष दिले. शासकीय रुग्णालयातील गैरव्यवस्थेमुळे रुग्णांच्या त्रासात भर पडली. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली.

गेल्या काही दिवसांत डॉक्टरांवर हल्ले वाढत आहे. या विषयावर सर्व वैद्यकीय संघटनांनी एकत्र येत संपाचे हत्यार उपसले असल्याने आरोग्य व्यवस्था ‘व्हेंटिलेटर’वर असल्याचे चित्र आहे. उपचाराअभावी अनेक महत्त्वपूर्ण शस्त्रक्रिया रखडल्याने व्याधी, वेदनांमुळे रुग्णांचे हाल सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर, आयएमए संघटनेने आपत्कालीन सेवा देण्याची तयारी दर्शवल्याने अनेकांना हायसे वाटले. शालिमार येथील आयएमएच्या कार्यालयापासून अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, सचिव डॉ. प्रशांत देवरे आदींच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मोठय़ा संख्येने डॉक्टर व विद्यार्थी त्यात सहभागी झाले. डॉक्टर समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असून त्यांच्यावरील हल्ले त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यांना निकोप वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा पुरविण्यात यावी, डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. धुळ्यासह शहरात डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुकारलेल्या संपाचे संघटनेने समर्थन केले. या मोर्चामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, दोन दिवसांपासून सुरू असलेल्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहे. यावर पर्याय म्हणून काही रुग्णांनी जिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालयाचा आधार घेतला.  मात्र सरकारी उदासीनता तसेच संपामुळे होणारी ओढाताण टाळण्यासाठी अनेकांनी उपचारासाठी जाणे टाळले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी गुरूवारी जिल्हा रुग्णालयातील बाह्य़ रुग्ण कक्षात २० टक्के रुग्णांची संख्या वाढली होती. त्यात हाडांचे दुखणे, प्रसूतिपूर्व तसेच प्रसूतीच्या काही प्रकरणांसह काही किरकोळ आजारांसाठी रुग्ण आले होते. त्यात शहर व ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश होता. शुक्रवारी मात्र नियमित उपचार घेणारे सोडले तर शहर व ग्रामीण भागातील रुग्ण रुग्णालयात फिरकले नसल्याचे त्यांनी सांगितले.

मोर्चेकऱ्यांचे सेल्फीसेशन

आयएमएने काढलेल्या मोर्चात पदाधिकाऱ्यांसोबत वैद्यकीय शिक्षण घेणारे प्रशिक्षणार्थी, डॉक्टर सहभागी झाले. मोर्चा नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरू झाला. उन्हाच्या झळा सहन न झाल्याने अनेकांनी सावलीचा आधार घेत उभे राहणे पसंत केले. दुसरीकडे, सावलीत निषेधाचा फलक हाती घेत काहींनी ‘सेल्फी’ काढण्याचा आनंद घेतला.