लष्करी सेवेप्रमाणे पोलीस दलातील सेवेला वेगळीच प्रतिष्ठा आहे. ही सेवा खडतर मानली जात असली तरी त्याकडे उच्चशिक्षितांचा ओढा वाढत असल्याचे महाराष्ट्र  पोलीस प्रबोधिनीतील उपनिरीक्षकांच्या ११३व्या तुकडीतील प्रशिक्षणार्थीच्या गुणवत्तेवरून लक्षात येते. या तुकडीत ६१७ पदवीधर, ९८ द्विपदवीधर, दोन कृषी पदवीधर, २२ अभियंता आणि १० डॉक्टरांचा समावेश आहे. आकर्षक वेतन आणि आलिशान जीवनशैलीची भुरळ पडलेल्या युवकांची प्रतिष्ठेच्या पण खडतर सेवा मानल्या जाणाऱ्या सैन्य दलात दाखल होण्याची ऊर्मी कमी होत असल्याचे निरीक्षण खुद्द संरक्षण विभागाने नोंदविले आहे.

यामुळे भारतीय सैन्य दलास मनुष्यबळ तुटवडय़ाचा सामना करावा लागत आहे. पोलीस दलातील सेवा ही लष्करी सेवेपेक्षा फारशी वेगळी नाही. खडतर प्रशिक्षण आणि अविश्रांत मेहेनतीची तयारी हा समान निकष असतो.

या स्थितीत राज्यातील उच्चशिक्षित युवकांना पोलीस दलाने भुरळ पाडल्याचे दिसते. महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकांच्या ११३व्या तुकडीचा दीक्षांत सोहळा बुधवारी सकाळी आठ वाजता मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमास नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, गृहराज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्यासह पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित उपस्थित राहणार आहेत. पोलीस अकादमीच्या मुख्य कवायत मैदानावर हा सोहळा होईल.

११३व्या तुकडीत सरळसेवेद्वारे ५०३ पुरुष व २४६ महिला असे एकूण ७४९ प्रशिक्षणार्थी लोकसेवेत रुजू होत आहे. त्यात अभियंते, डॉक्टर व कृषी पदवीधारकांनी पोलीस सेवेला प्राधान्य दिल्याचे दिसून येते.