पालिका प्रशासन शहराला ‘स्मार्ट’ करण्यासाठी कागदी घोडे नाचवित असले तरी ज्या गल्ली-बोळात मोकाट कुत्रे धुडगूस घालतात, बालके व महिलांना लक्ष्य करतात, त्या ठिकाणी प्रशासन नव्हे तर खुद्द नगरसेवकही दुर्लक्ष करत असल्याची नागरिकांनी तक्रार आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक ३ मध्ये साईशिवनगरच्या रहिवाशांना कुत्र्याच्या हल्ल्यानंतर याच विदारक अनुभवाला सामोरे जावे लागले.
शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या किती याचा थांगपत्ता खुद्द पालिकेला नाही. शहरातील सर्व भागात त्यांचे प्रस्थ आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना दबा धरून बसलेले कुत्रे कधी हल्ला करेल याचा नेम नाही. रात्रपाळीत काम करणाऱ्यांसह अनेकांना त्याचा अनुभव आहे. मोकाट कुत्र्यांनी धुडगूस घालून अनेकदा लहान बालकांवर जिवघेणा हल्ला केला आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये पुन्हा त्याची पुनरावृत्ती घडली. साईशीवनगरमध्ये सकाळच्या सुमारास कमल सोनवणे (५०) आणि राजू चव्हाण (४) यांच्यावर मोकाट कुत्र्याने हल्ला चढविला. चार वर्षीय बालकाच्या मानेचा लचका तोडला. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून संबंधितांना वाचविले. या हल्ल्यात दोन्ही जण गंभीर जखमी झाले आहेत. सरस्वतीनगरसह साईनगर, साईशिवनगर, त्रिवेणी बंगला, निर्मल नगर, नारायण नगर, गजानन कॉलनी आदी भागात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची तक्रार जननायक वैचारिक मंच संघर्ष समितीने केली. गंभीर बाब म्हणजे, पालिका आणि स्थानिक नगरसेवकांकडे तक्रार करूनही फारसा उपयोग होत नाही. संबंधितांकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सिंहस्थामुळे शहराचे रुप पालटण्यास हातभार लागला. चकचकीत व विस्तीर्ण रस्त्यांमुळे नाशिक ‘स्मार्ट’ वाटू लागले. त्यातच देशातील स्मार्ट शहरांच्या स्पर्धेतील यादीत नाशिकचा समावेश झाला. पालिका प्रशासन व नगरसेवकही त्या अनुषंगाने कागदी घोडे नाचविण्यात मग्न झाले. स्थानिकांना दररोज भेडसावणाऱ्या समस्यांकडे संबंधितांचे दुर्लक्ष झाले. शहराला स्मार्ट करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी स्मार्ट असणे तितकेच गरजेचे आहे. स्वत:च्या कार्यशैलीत बदल घडवून आणण्याऐवजी संबंधितांकडून ‘स्मार्ट सिटी’चा निव्वळ देखावा तयार केला जात असल्याची नागरिकांची भावना आहे.