कौटुंबिक कलह, संवादाचा अभाव, नैराश्य याचा परिणाम    

नाशिक : करोनाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतांना नातेसंबंधावरही तो परिणामकारक होत आहे. त्यामुळेच टाळेबंदीच्या काळात जिल्ह्य़ात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. टाळेबंदी संपल्यानंतर हे चित्र अधिक गडद होण्याची शक्यता आहे.

टाळेबंदीमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या. अनेकांच्या हातातील काम गेले. काहींनी गावाकडे प्रस्थान केले. काही कुटुंबात आर्थिक काटकसर करून दिवस पार पाडले जाऊ लागले. या सर्वांचा अप्रत्यक्ष परिणाम हा कौटुंबिक हिंसाचार वाढीस लागण्यास होत आहे. झोपडपट्टीपासून उच्चभ्रु समाजापर्यंत टाळेबंदीमुळे नात्यांवर परिणाम होत असून कौटुंबिक कलहात वाढ झाली आहे. परिणामी कौटुंबिक हिंसाचार वाढत असल्याचे निरीक्षण भरोसा सेलच्या प्रमुख संगिता निकम यांनी नोंदविले. टाळेबंदीमुळे सर्वजण घरात अडकल्याने बराचसा वेळ हा कुटूंबातील अन्य सदस्यांसोबत घालविण्यात येत आहे. संवादाची जागा यातून वादाने घेतली. काही ठिकाणी हा सर्व ताण लहानग्यांवर निघून त्यांना मारहाण होत आहे. मुलांना का मारले, यावरून पत्नीलाही  मारझोडीच्या घटना घडल्या आहेत. व्यसनाधीन व्यक्तीला घरात  नशा करण्यावर निर्बंद आल्याने नैराश्यातूनही घरातील महिलांना मारझोड होत आहे.

मध्यवर्गीयांमध्ये बराचसा वेळ टीव्ही, भ्रमणध्वनी पाहण्यात जात आहे. भ्रमणध्वनीवर इतका वेळ कोणाशी बोलत आहे, यावरून पती-पत्नीत एकमेकांविषयी संशयाचे वातावरणही निर्माण झाले आहे. याशिवाय जेवण वेळेत वाढले नाही, भाजीला चव नाही, अशा क्षुल्लक कारणांवरून भांडणे विकोपाला गेली असल्याचे निकम यांनी सांगितले. दिवसाला अशा प्रकारच्या तक्रारींचे दोन ते तीन दूरध्वनीतरी येतात. उच्चभ्रुंचे प्रश्न वेगळे आहेत. बाहेरील काही गैरप्रकार यानिमित्ताने कुटुंबातील सदस्यांसमोर आल्याने भांडणांमध्ये भर पडली. मुळात काही ठिकाणी पती-पत्नी नात्यात विसंवाद होताच, तो या काळात मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने त्याची परिणती काही ठिकाणी नाते संपविण्या पर्यंत झाली आहे. याविषयी तक्रार प्राप्त होताच भरोसा सेलकडून समुपदेशन तसेच प्रत्यक्ष घरी जावून किंवा दूरध्वनीवरूनच समज देण्यात येत आहे. या तक्रारींमध्ये टाळेबंदी संपताच मोठय़ा संख्येने वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

मानसिक तणावात तज्ज्ञांची मदत गरजेची

करोना आणि टाळेबंदीच्या काळात मानसिक ताणतणाव आणि मानसिक आजार जास्त प्रमाणात वाढीस लागले आहेत. नैराश्य आणि चिंता जास्त प्रमाणात दिसत आहे. आर्थिक, व्यावसायिक, नोकरी, समाजात एकटे पडल्याची भावना अशा विविध कारणांमुळे वैफल्य, नैराश्य वाढत आहे. यासाठी तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. परंतु, हे करण्याऐवजी राग महिलांवर निघत आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून स्त्रियांवरील अत्याचारात वाढ झाली आहे.

– डॉ. हेमंत सोननीस (मानसोपचार तज्ज्ञ)