27 May 2020

News Flash

अंगणवाडी सेविकांची दुहेरी कोंडी

सुरक्षेच्या दृष्टीने सरकारकडून साहित्य नाही तर कुटुंबातही विलगीकरणाने संवाद कठीण

संग्रहित छायाचित्र

चारुशीला कुलकर्णी

घरातून कामासाठी बाहेर पडताना घरच्यांचा राग अनावर होतो. बाहेर पडल्यावर कोणी धड माहिती देत नाही. कुठल्याही घरात जाऊन माहिती गोळा करावी लागते. घरी आल्यावर पुन्हा घरच्यांच्या रोखलेल्या नजरा. एवढी मरमर करून उपयोग काय..

ही व्यथा आहे आशा, अंगणवाडी सेविकांची. करोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडिमार होत असतांना विमा जाहीर करण्यापेक्षा ‘आम्हांला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या’ एवढीच माफक अपेक्षा आशा व्यक्त करत आहेत.

करोना चे सावट गडद होत असतांना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या व्यक्तीला काय त्रास होत आहे, त्याची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे काम आशा, अंगणवाडी सेविका करत आहेत. या माहिती आधारे आरोग्य विभाग, सरकार दरबारी वेगवेगळ्या योजनांची आखणी होत असताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित आहेत. करोनाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य पुरवले गेलेले नाही.

लासलगाव परिसरात करोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर आशा-अंगणवाडी सेविकांच्या हातात मोजे, मास्क देत त्यांची बोळवण करण्यात आली. सर्वेक्षणाच्या जबाबदारीसाठी त्यांना कुठलाही प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार नाही. वेतन नियमित मिळेल हा शब्द नाही. केवळ आशा कार्यकर्ती नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे धोक्याचे काम करत आहेत. या कामात प्रशासनाकडून दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असताना गाव पातळीवरही काही ठिकाणी त्यांना धक्काबुक्की, अपमान सहन करावा लागतो.

दुसरीकडे, घरातही वेगळेच प्रश्न. कशाला बाहेर पडतेस, पगार मिळत नाही. उगाच आजार घेऊन येशील, अशी बोलणी ऐकत घरात रहावे लागत आहे. या विचित्र कोंडीत अडकलेल्या आशांची पगारवाढ करून देत नियमित वेतन द्यावे एवढीच माफक अपेक्षा आहे. यासाठी त्यांची दिवसरात्र काम करण्याची तयारी आहे. सरकारकडून वेळोवळी उपेक्षा होत असताना आशा, अंगणवाडी सेविका एका वेगळ्याच दृष्टचक्रात अडकल्या आहेत. याविषयी चांदोरी येथील आशासेविकेने आपले म्हणणे मांडले. मागील वर्षी पतीची हृदय शस्त्रक्रिया झाली.

मुलाला मेंदूचा त्रास आहे. अशा स्थितीत घरातील कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करत काम सुरू आहे. वेतन वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी समोर आहेत. करोनामुळे या अडचणी वाढल्या आहेत. दिवसाला सर्वेक्षणाची असणारी सक्ती, अहवाल याचा मोबदला काहीच नाही. कुटूंबातील सदस्य वैतागले असून घरातून कामासाठी बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

घरी आल्यावर अंगावरचे कपडे धुऊन टाका, इतकेच काय अंघोळ करून एकाच घरात राहत असूनही त्या विलगीकरणची प्रक्रिया पार पाडत आहेत. कुटुंबातील अन्य सदस्यांसोबत बोलणेही दुरापास्त झाले आहे. लासलगांव येथील आशासेविकेनेही आपली भूमिका मांडली. सरकारने ५० लाखांचा विमा जाहीर केला. गेल्यानंतर या पैशांचे काय करायचे? त्यापेक्षा आमचे वाढवून दिलेले वेतन वेळेत द्यावे. किमान कुटुंबाच्या गरजा पूर्ण होतील अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हा परिसरात अशा अनेक आशा जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांना एकच मास्क दिला आहे. तो कुठंवर कामाचा, रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा दिलेला नाही. हे चित्र पालटावे, अशी मागणी आशासेविकांकडून होत आहे.

आशा-अंगणवाडी सेविका तळागाळापर्यंत पोहचून काम करत आहेत. मात्र शासनाचा त्यांच्याशी संवाद नाही. कुटुंब म्हणतं मानधन नाही. कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत, मग या हमाल्या कशाला करतात?, तुमच्यामुळे हा आजार घरात आला तर त्याला जबाबदार कोण? आशा-अंगणवाडी सेविकांना किमान आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जाव्या. त्यांच्या कामासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्याची तरतूद शासनाने करावी.

-राजू देसले , राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटना

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2020 12:31 am

Web Title: double stuck for anganwadi seviks abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाबाधित क्षेत्रातून आलेल्यांनी स्वत:हून पुढे यावे
2 व्यक्तिगत सुरक्षा संचा अभावी डॉक्टर-परिचारिकांची सुरक्षा धोक्यात
3 करोनामुळे शेतकरी-ग्राहक दोघांनाही फटका
Just Now!
X