02 March 2021

News Flash

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जल्लोषात मिरवणूक

सायंकाळी नाशिकसह इतरत्र मिरवणुकीस उत्साहात सुरुवात झाली.

नाशिक शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील चित्ररथ. 

सामुदायिक बुद्धवंदना, अभिवादन सभा, व्याख्यान, प्रतिमा पूजन आणि भव्य मिरवणूक.. अशा विविध उपक्रमांनी शुक्रवारी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंडय़ांमुळे वातावरण निळेमय झाले. सायंकाळी नाशिकसह इतरत्र मिरवणुकीस उत्साहात सुरुवात झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, संस्था-संघटनांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले. ठिकठिकाणी आकर्षक रोषणाईने व्यासपीठ सजविण्यात आले. मध्यरात्री शिवाजी रस्त्यावरील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी आ. बाळासाहेब सानप व प्रा. देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी व भीमसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. जागोजागी कमानी, स्वागतफलक, विद्युत रोषणाई, पताका आणि झेंडे लावण्यात आल्याने व भीमगीतांच्या सुरांनी वातावरण भारावलेले होते. नाशिकरोड व देवळाली कॅम्प भागात आंबेडकर जयंतीचा वेगळाच उत्साह असतो. संपूर्ण परिसर निळ्या झेंडय़ांनी व आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला होता. सायंकाळी नाशिक शहरातील मुख्य मिरवणुकीस मोठा राजवाडा भागातून सायंकाळी प्रारंभ झाला. या वेळी लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध संकल्पनांवर आधारलेले चित्ररथ, ‘जय भीम’चा उल्लेख असणारे टी-शर्ट, रिबिन्स व टोप्या परिधान केलेले कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले.

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, शिवसेना पक्षांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. महापालिका, समाज कल्याण विभाग यासह विविध शासकीय कार्यालयातही डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पंचवटी सार्वजनिक वाचनालयात डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. डॉ. शांताराम रायते यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याबद्दल माहिती दिली. मनसेच्या राजगड कार्यालयात डॉ. आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी महापौर अशोक मुर्तडक, डॉ. प्रदीप पवार, अ‍ॅड. राहुल ढिकले, सलीम शेख आदी उपस्थित होते. भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात नगरसेवक योगेश हिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजित सामाजिक समता सप्ताहाचा समारोप साहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आला. या वेळी सारिका गवते व निशा गवळे या विद्यार्थिनींनी डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य या विषयावर मनोगत व्यक्त केले. सप्ताहात महाविद्यालये, आश्रमशाळा, शासकीय व अनुदानित वसतिगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील लघुनाटय़, प्रश्नमंजूषा, वाद विवाद स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबीर, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये स्वच्छता अभियानही राबविण्यात आल्याची माहिती विभागाकडून देण्यात आली.

शहराच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मानाचे स्थान असणाऱ्या आणि शतकोत्तर वाटचाल करणाऱ्या मनमाड सार्वजनिक वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांची जयंती संयुक्तपणे साजरी करण्यात आली. जयंतीचे औचित्य साधून वाचनालयाने सुमारे एक लाख तीन हजार रुपये किमतीची ५५० पुस्तकांची ग्रंथसंपदा वाचकांसाठी खुली करण्यात आली.

आजपासून व्याख्यानमाला

येथील वकील विचार मंचतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म दिन वकील दिन म्हणून साजरा झाला. यानिमित्त शनिवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून तिचे उद्घाटन जिल्हा न्यायाधीश अरुण ढवळे यांच्या हस्ते होणार आहे. शालिमार येथील आयएमए सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता ही व्याख्यानमाला होईल. व्याख्यानमालेचे पहिले पुष्प महेंद्र गरोडिया हे वकिली व्यवसायात वकिलांचा व्यक्तिमत्त्व विकास या विषयावर गुंफणार आहेत. १७ एप्रिल रोजी ज्येष्ठ वकील एस. एल. देशपांडे यांची मुलाखत अ‍ॅड. जयंत जायभावे घेणार आहेत. ‘उलट तपासणीचे तंत्र व वकिलांची सामाजिक जबाबदारी’ या विषयावर ही मुलाखत होईल. १८ एप्रिल रोजी प्रा. डॉ. आनंद करंदीकर यांचे ‘घटना समितीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य’ या विषयावर तर माजी जिल्हा न्यायाधीश बी. एल. वाघमारे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक न्यायाची भूमिका’ या विषयावर व्याख्यान होईल. व्याख्यानमालेचा वकील व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मंचचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब ननावरे, सरचिटणीस अ‍ॅड. अरुण दोंदे आदींनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2017 12:47 am

Web Title: dr babasaheb ambedkar miravnuk
Next Stories
1 देशातील प्रत्येक गरीबाला २०२२ पर्यंत हक्काचे घर : डॉ. सुभाष भामरे
2 ‘सहकारी’ भ्रष्टाचारास आता अधिकारीही जबाबदार
3 ग्रामीण भागातही बालकांना मानसिक आजार
Just Now!
X