संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरूपद

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या नियुक्तीने विद्यापीठाच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखांना वगळून वाणिज्य शाखेतील उमेदवाराची नियुक्ती झाली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, कुलपती डॉ.विद्यासागर राव यांनी न्या. रमेश सुरजमल गर्ग यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या शोध समितीकडे व नोडल ऑफिसर डॉ. श्रीनिवास शास्त्री यांना पत्र लिहून या विद्यापीठातील समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. संतोष ठाकरे यांनी यावेळी तरी कला, वाणिज्य  किंवा समाजविज्ञान विद्याशाखेतील उमेदवार कुलगुरुपदासाठी निवडावा, अशी विनंती केली होती. कारण, अमरावती विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. के.जी. देशमुख यांच्यापासून तर डॉ. गणेश पाटील, डॉ. एस.टी. देशमुख, डॉ.सुधीर  पाटील, डॉ. कमलसिंग, डॉ. मोहन खेडकर हे सारे कुलगुरू किंवा डॉ. जयंत देशपांडे, डॉ. एस.व्ही. जामोदे किंवा डॉ. एस.व्ही. सपकाळ हे प्रभारी कुलगुरू विज्ञान, तंत्रविज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखांमधून आलेले होते. लोकसत्तात डॉ. ठाकरे यांची ही मागणी प्राधान्याने प्रसिध्द झाली होती. गंमत ही की, स्वत डॉ. ठाकरे या पदाचे एक उमेदवार होते, त्यामुळे उलटसुलट चच्रेला खूप रंगत आली होती. डॉ. ठाकरे यांची शोध समितीने पात्र ठरविलेल्या २५ उमेदवारांमध्येही निवड झाली होती. मात्र, अंतिम टप्प्यात ज्या पाच उमेदवारांची शिफारस शोध समितीने राज्यपालांकडे केली होती त्यात त्यांचे नाव नव्हते. असे असले तरी विद्यापीठाला प्रथमच वाणिज्य शाखेचा कुलगुरू लाभला आहे, ही बाब अधोरेखित झाली आहे.

या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाला समाजविज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतून कुलगुरुपदासाठी उमेदवार निवडला जावा, अशी डॉ. संतोष ठाकरे यांची मागणी फलद्रुप झाली आहे. कुलगुरू हा अमुक एका विद्याशाखेचा असावा, असा आग्रह उचित नसल्याची तेव्हा टीकाही झाली होती. कारण, कुलगुरुपद प्रशासकीय पद असल्याने त्या पदाचा संबंध विद्याशाखेशी जोडणे योग्य नाही, असाही एक मतप्रवाह होता आणि आहे.

डॉ. संतोष ठाकरे यांचे स्पष्टीकरण

कुलगुरुपदासाठी आपण अर्जच केलेला नाही, असे स्पष्टीकरण खुद्द डॉ. संतोष ठाकरे यांनी ‘लोकसत्ता’ जवळ केले होते. मात्र गंमत अशी की, ज्या पात्र २५ उमेदवारांच्या मुलाखती शोध समितीने नागपुरात घेतल्या त्यात त्यांचेही नाव होते आणि त्यांनी मुलाखतही दिली होती. अधिष्ठाता असलेल्या डॉ. संतोष ठाकरे यांनी दिशाभूल केल्याने त्यांची विश्वासार्हता कमी झाल्याची विद्यापीठात चर्चा आहे. या संदर्भात विचारल्यावर ते म्हणाले की, ‘मी अर्ज केलेला नाही’ या माझ्या विधानावर आजही कायम आहे. शोध समितीकडे अर्ज नसलेल्या उमेदवाराचा स्वत समिती शोध घेऊ शकते. माझा अर्ज जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांनी पाठवला होता. प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे अमरावती विद्यापीठात समाजविज्ञान शाखेचे अधिष्ठाता असून रेकॉर्डवर त्याचे नाव डॉ.बी.एम. ठाकरे असे आहे, पण ते उपाख्य संतोष ठाकरे या नावाने परिचित आहेत.

बी.एम., व्ही.एम.ची चर्चा केली ‘एन्जॉय’

अमरावती विद्यापीठात पदव्युत्तर संगणकशास्त्र विभागात डॉ. व्ही.एम.ठाकरे प्रमुख आहेत. त्यांचे नाव शोध समितीने पात्र ठरवल्याची चर्चा होती. मुळात त्यांचे नाव नव्हते, तर डॉ.बी.एम. ठाकरे यांचे नाव होते. बी.एम. ठाकरे की, व्ही.एम. ठाकरे, असा घोळ अनेक दिवस चालला आणि तो या दोघांनीही चांगला ‘एन्जॉय’ केला.