नवोदितांसह हौशी रंगकर्मीना नाटकांच्या तालमीसाठी महापालिकेच्या महाकवी कालिदास कला मंदिरातील दोन सभागृहे अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेला दिली गेली असली तरी ती सभागृहे स्वमालकीची असल्याप्रमाणे शाखेची कार्यशैली असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. रंगकर्मीना वगळून शाखेची दोन्ही सभागृहे अन्य काही संस्थांना भाडे तत्त्वावर उपलब्ध केली जातात असेही संबंधितांचे म्हणणे आहे. परंतु, नाटय़ परिषदेने या तक्रारी तथ्यहीन असल्याचे सांगत या सभागृहात नवोदित रंगकर्मीचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेने महाकवी कालिदास कला मंदिराची उभारणी करत स्थानिक कलावंतांना अभिव्यक्त होण्यासाठी तसेच कला क्षेत्रातील विविध आविष्कार अनुभवता यावे, यासाठी हक्काचे व्यासपीठ तयार केले. स्थानिक कलावंतांच्या गरजा ओळखत पालिकेने नाटय़ परिषद शाखेला वास्तूतील वरच्या मजल्यावरील दोन सभागृहे उपलब्ध करून दिली. मध्यंतरी कला मंदिराच्या दुरवस्थेचा अंक सुरू असताना याच वास्तूतील अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेने नवीन अंकात भर घातली. नाटय़ परिषद शाखा मनमानीपणे कारभार करते, ही वास्तू स्वमालकीची असल्यासारखे त्यांचे वर्तन असते, हौशी कलाकारांसह अन्य रंगकर्मीना सभागृह दिले जात नाही, असा काही रंगकर्मीचा आक्षेप आहे. बालनाटय़शिबिराला जागा दिली जात नाही. सराव सुरू असताना सभागृहातून बाहेर काढले जाते. मर्जीतील व्यक्तींना सभागृह दिले जाते.

हौशी कलाकारांना दालन न देता अन्य काही व्यक्ती, संस्थांना भाडेतत्त्वावर जागा दिली जात असल्याची अनेकांची भावना आहे.

कला मंदिरातील सभागृहाविषयी रंगकर्मीनी केलेल्या आरोपांचे नाटय़ परिषदेचे कार्यवाह सुनील ढगे यांनी खंडन केले. हे सर्व आरोप खोटे असून परिषद नेहमीच रंगकर्मीना सहकार्याच्या भूमिकेत राहिल्याचा दावा त्यांनी केला. प्रारंभीच्या काळात परिषद रंगकर्मीना सभागृह तालमीसाठी नि:शुल्क उपलब्ध करून देत असे. मात्र त्यातील वस्तूंची नासधूस केली गेली. यामुळे जो प्रथम अर्ज करेल, त्याला एका सत्रासाठी म्हणजे तीन तासासाठी ५० रुपये शुल्क आकारून एक सभागृह रंगकर्मीना दिले जाते. दुसऱ्या सभागृहात नाटय़ परिषदेचे कार्यालय आहे.

बालनाटय़ चळवळ पुन्हा जोमात यावी यासाठी सुट्टीच्या काळात खास शिबीर घेतले जाते. तसेच नाटय़ अभिवाचनाचाही उपक्रम सुरू आहे. युवा रंगकर्मीना सभागृहे दिली की टवाळखोरीचे प्रमाण वाढते. सहा-सात महिने तालीम करत केवळ एक प्रयोग करत नाटक बंद पडते. दुसरीकडे, पालिकेच्या सहकार्याने मागील वर्षी हौशी कलाकारांना ‘दोन हजारात नाटक’ ही अभिनव योजना सुरू केली होती. त्यास रंगकर्मीचा प्रतिसाद नाही अशी खंत ढगे यांनी व्यक्त केली.

दोन हजार रुपयात नाटक अधांतरी

नाटय़ परिषदेने हौशी रंगकर्मीना संस्थेच्या माध्यमातून नाटक सादर करण्यासाठी ‘दोन हजार रुपयात नाटक’ अशी योजना सुरू केली आहे. त्यात वर्षांतील कोणत्याही एका दिवसातील एक सत्र त्या संस्थेला दोन हजार रुपयात मिळू शकते. यात कालिदास कला मंदिराचे भाडे तसेच सर्व सोयी उपलब्ध आहेत. संस्थेने नाटकाचे तिकीट ५० रुपये ठेवणे गरजेचे आहे. मागील वर्षी सुरू झालेल्या योजनेत केवळ तीन ते चार संस्थांनी सक्रियता दर्शविली.