सदनिकांच्या किमतीत १४ ते ४७ टक्के कपात *   १ हजार १३३ घरांसाठी सोडत काढणार

नाशिक : शहरात वेगवेगळ्या भागात ‘म्हाडा’ने उभारलेल्या प्रकल्पातील सदनिकांना दीड-दोन वर्षांत प्रतिसाद लाभला नाही. त्याचे कारण या घरांच्या प्रचंड किमती. अखेर ‘म्हाडा’ने त्यात १४ ते ४७ टक्क्य़ापर्यंत कपात करत सामान्यांना आकृष्ट करण्याची धडपड सुरू केली आहे. नाशिक शहरासह धुळे, श्रीरामपूर येथील कमी किंमत केलेल्या ११३३ सदनिकांची चार एप्रिल रोजी सोडत काढली जाणार आहे.

नाशिक गृहनिर्माण-क्षेत्र विकास मंडळांतर्गत विभागातील नाशिक, धुळे आणि श्रीरामपूर या तीन शहरात म्हाडाच्या ११३३ सदनिका उपलब्ध आहेत. या सदनिकांच्या किंमती बाजार भावापेक्षा जास्त असल्याने त्यांची विक्री करणे अवघड झाले आहे. मागणी नसल्याने एक-दीड वर्षांपासून अनेक सदनिकांची विक्री झाली नाही. ही बाब लक्षात घेऊन सदनिकांच्या किमती १४ ते ४७ टक्क्य़ांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. किंमत कमी केलेल्या या सदनिकांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी बुधवारी ऑनलाइन नोंदणीचा शुभारंभ म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कमी झालेल्या किमतीबाबत त्यांनी माहिती दिली.

आडगाव-म्हसरूळ लिंक रोडवरील गट क्रमांक ६०९ येथील प्रकल्पात सदनिकेची पूर्वी १०.२४ लाख असणारी किंमत आता ८.१९ लाख रुपये करण्यात आली आहे. याच गट क्रमांकातील अधिक क्षेत्रफळाच्या सदनिका अनुक्रमे १३.८७ (पूर्वीची किंमत १७.३३ लाख) आणि १९.६२ लाख (२४.५२ लाख) झाली. पंचक शिवारातील रेल्वे मार्गाजवळील प्रकल्पातील सदनिका १३ लाखात मिळेल. आधी तिची किंमत २४.९८ लाख होती. पाथर्डी शिवारात वेगवेगळ्या प्रकल्पात वेगवेगळ्या क्षेत्रफळाच्या सदनिका आहेत. त्यांच्या किमती १९.९५ लाखावरून १५.९६ लाख, २८.८३ वरून २३.०६ लाख, २९.०८ वरून २३.२६ लाख, मखमलाबाद शिवारातील सदनिका २६.२८ लाखवरून २१.०२, म्हसरूळ शिवारात २६.९५ वरून २१.५६, १७.३३ वरून १३.८७ लाख इतकी किंमत करण्यात आली. हे दर सामान्यांना परवडणारे असून इच्छुकांना २२ मार्चपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तीन एप्रिल रोजी सोडत काढण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अर्जदारासाठी १८ वर्षांपेक्षा अधिक वयोमर्यादा आहे. अर्जदाराला १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्याचे रहिवासी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. अर्जदार एकापेक्षा जास्त योजनेत अर्ज करू शकतो. सोडतीत एकापेक्षा जास्त सदनिकेसाठी अर्जदार यशस्वी झाल्यास त्याला एकच सदनिका दिली जाईल, असे म्हाडाने स्पष्ट केले आहे.

मुंबईच्या धर्तीवर घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. यामुळे म्हाडाच्या सदनिका सामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. स्वत:च्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरून सोडत पद्धतीत सहभागी व्हावे, असे आवाहन सामंत यांनी केले.

..तर राजकारणातून निवृत्ती

म्हाडाची संगणकीय सोडतीची प्रक्रिया पारदर्शक आहे. त्याबद्दल कोणाला काही संशय वाटल्यास त्यांनी पुराव्यासह ते सिद्ध केल्यास आपण राजकारणातून निवृत्ती घेऊ, असे आव्हान म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांनी दिले. मुंबईत म्हाडाच्या सोडतीत शिवसेनेच्या काही नेत्यांना लॉटरी पद्धतीने सदनिका मिळाल्या. त्यात काहींना तर दोनवेळा लॉटरी लागली. यामुळे ही प्रक्रिया पारदर्शक आहे की नाही? याबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नावर सामंत यांनी स्पष्टीकरण दिले. ज्यांना म्हाडाच्या दोन सदनिका मिळाल्या, त्यांची चौकशी करून एक सदनिका परत घेतल्या गेल्या. आरोप-प्रत्यारोप करणारे अद्याप पुरावे देऊ शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. संगणकीय सोडत प्रणालीबद्दल उपस्थित झालेल्या प्रश्नावर त्यांनी ही प्रणाली पारदर्शक असून पुढेही ती पारदर्शक राहणार असल्याचे स्पष्ट केले.