08 April 2020

News Flash

देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण

मुलांना मोठे करायचे, त्यांना शिक्षण द्यायचे हा विचार करत तिची धावपळ सुरू झाली.

मोलमजुरी करणाऱ्या अविनाश शिंदे याची प्रेरणादायी कहाणी

नांदगाव : पाचवीलाच पुजलेल्या गरिबीमुळे एकवेळच्या जेवणाचीदेखील भ्रांत असायची. त्यातच वडिलांचे छत्र हरपले. अशा बिकट प्रसंगातही न डगमगता त्याने देशसेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न बाळगले. मोलमजुरी करून आईला घर चालविण्यास हातभार लावतानाच सैन्यात जाण्यासाठी अभ्यास आणि व्यायामही सुरू ठेवला. पहिल्या दोन ते तीन प्रयत्नात अपयश येऊनही त्याने जिद्द सोडली नाही. त्याच्या जिद्दीपुढे अखेर अपयशाने मान झुकविली आणि शहरातील ढासे मळा परिसरात राहणाऱ्या अविनाश शिंदे याचे सैन्यात भरती होण्याचे स्वप्न साकार झाले.

एका पत्र्याच्या घरात राहणाऱ्या अविनाशची ही धडपड अनेक तरुणांना प्रेरणादायी ठरेल. शहरातील ढासे मळा परिसरात राहणारे शिंदे कुटुंबीय अत्यंत हलाखीत दिवस काढत होते. त्यातच कुटुंबाचा कर्ता म्हणजे अविनाशचे वडील संजय शिंदे यांचे आजारपणाने निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्याने कुटुंबीयांची जबाबदारी आईवर आली. मोलमजुरी करून ती कुटुंब सांभाळू लागली.

मुलांना मोठे करायचे, त्यांना शिक्षण द्यायचे हा विचार करत तिची धावपळ सुरू झाली. आईची धावपळ बघून आईला घरात मदत करावी म्हणून अविनाश आणि त्याचा लहान भाऊ दोघेही गवंडय़ाच्या हाताखाली काम करू लागले. एवढय़ा लहान वयात मुलांना मजुरी करावी लागत असल्याचे आईला बघवत नव्हते. पण परिस्थितीपुढे हतबल असलेल्या त्या आईने मुलांसमोर कामाबरोबर शिक्षण घेण्याचाही आग्रह धरला.

अविनाशने सैन्यात भरती होऊन देशसेवा करायचे स्वप्न उराशी बाळगले. त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. दिवसभर सिमेंट, वाळूची कामे करून सायंकाळी मैदानावर जाऊन सैन्य भरतीला अनुसरून तीन ते तीन तास व्यायाम करायचा. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा, असा त्याचा दिनक्रम सुरू झाला. अविनाशचा लहान भाऊदेखील त्याला या कामात मदत करीत होता. हिसवळ येथील ज्ञानेश्वर बोगीर यांची त्याला मोलाची साथ मिळाली. तांत्रिकदृष्टय़ा असलेले सैन्य भरतीचे बाळकडू त्यांनी अविनाशला दिले. प्रारंभी दोन ते तीन वेळा सैन्य भरतीसाठी प्रयत्न करूनही अविनाशला अपयश आले. पण त्याने जिद्द सोडली नाही. पुन्हा एकदा भरतीसाठी त्याने प्रयत्न सुरू केले.

मुंबई येथील मुंब्राच्या मैदानात भरतीप्रसंगी त्याने शारीरिक क्षमतेचा टप्पा पार केला. त्यानंतर लेखी परीक्षा दिली. निकाल काय लागतो, याची त्याला उत्सुकता होती. दुसरीकडे गवंडय़ाच्या हाताखाली काम करण्याचे त्याचे नियमित काम सुरूच होते.

नुकताच लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. निकाल समजला तेव्हादेखील तो कामावरच होता. मित्राने भ्रमणध्वनीवरून ‘तुझा सैन्य भरतीचा निकाल लागला आणि तू पास झाला’ अशी बातमी दिली. आणि अविनाशला आभाळ ठेंगणे झाले. हे ऐकताना अंगावर शहारे येत होते, असे त्याने सांगितले. आईला निकाल सांगितल्यावर पेढा भरवताना दोघांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. पोरांचा बाप गेल्यापासून पोरं कष्ट उपसताहेत. खूप हलाखीचे दिवस काढत इथपर्यंत पोरांनी ओढून आणले, याचा सार्थ अभिमान असल्याची प्रतिक्रिया अविनाशच्या आईने पदराने डोळे पुसत दिली.

माझा मित्र सैन्यात भरती झाल्यापासून उराशी जिद्द बाळगली होती. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने मोलमजुरी केली. म्हणतात ना ‘भगवान के घर देर है अंधेर नही’ त्याप्रमाणे माझी इच्छा पूर्ण झाली. खूप मेहनत केली. मेहनतीचे फळ मला मिळाले. आता कधी रुजू होतो याची उत्सुकता लागली आहे. – अविनाश शिंदे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2020 12:05 am

Web Title: dream completely army force joiningavinash shinde akp 94
Next Stories
1 अजित पवारांनी थोपटली नाशिकच्या इंजिनिअर तरूणीची पाठ; कारण…
2 ढगाळ वातावरणामुळे उन्हाळ्याची चाहूल
3 पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आज ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम
Just Now!
X