सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बसची खरेदी, १२० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे रुंदीकरण, ५८ किलोमीटरचे वर्तुळाकार रस्ते, पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी १५० किलोमीटरचा पदपथ, शहरात येणाऱ्या माल वाहतुकीला सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बंदी, चौकांची रचनात्मक सुधारणा, रस्त्यालगत वाहनतळाची व्यवस्था.. पुढील वीस वर्षांतील शहराची गरज आणि स्थिती लक्षात घेऊन विविध प्रकल्पांचा अंतर्भाव असणारा तब्बल ४१३५.९९ कोटींचा र्सवकष वाहतुकीचा प्रारूप आराखडा मंगळवारी महापालिकेत आयोजित बैठकीत सादर करण्यात आला. आराखडय़ावर नगरसेवक, विविध संघटनांच्या प्रतिनिधी व वाहतूक विषयाशी संबंधित घटकांनी विविध सूचनाही केल्या.

‘स्मार्ट सिटी’ योजनेत समाविष्ट झाल्यानंतर महापालिकेने नाशिक शहराचा र्सवकष वाहतूक आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक केली होती. हा आराखडा अंतिम करण्यासाठी हितधारक व भागधारकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत हा आराखडा सल्लागार कंपनीचे प्रमुख एस. रामकृष्ण यांनी सादर केला. २०१६-२०३६ या कालावधीसाठी हा आराखडा तयार करण्यात आला आहे. नाशिक शहराचे क्षेत्रफळ २६७.४८ चौरस किलोमीटर असून २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १४.८६ लाख आहे. लोकसंख्या वाढीचा वेग ३.३ टक्के आहे. शहरात २०१६ पर्यंत ७.३२ लाख वाहनांची नोंद झाली असून त्यात वेगाने वाढ होत आहे. त्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक म्हणजे ७४.६ टक्के तर १२.३ टक्के चारचाकी वाहने आहेत. खासगी वाहनांची वेगाने वाढणारी संख्या वाहतुकीच्या समस्या वाढवित आहे. शहराला सध्या वाहतुकीची कोंडी, वाहनतळाची अडचण, मंदावलेला वाहतुकीचा वेग, चौकांची कोंडी, पादचाऱ्यांच्या अडचणी, अवैध प्रवासी वाहतूक अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एसटी महामंडळातर्फे चालविण्यात येणाऱ्या शहर बस वाहतुकीची स्थिती आणि होणारा तोटा यामुळे समस्यांमध्ये भर पडली आहे. महामंडळ ५०८ मार्गावर २४३ बसेस चालवते. या माध्यमातून दररोज १.२३ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे निरीक्षण कंपनीने नोंदविले आहे.

रस्ते विकासासाठी एकूण ७६० कोटी, पादचारी प्रकल्प १८४, बस व्यवस्था २०६१, माल वाहतूक ९५.१०, सुरळीत वाहतूक १३०, वाहनतळ ४.२४ असा एकूण ४१३५ कोटींच्या खर्चाचा अंदाज वर्तविण्यात आला. उपरोक्त प्रकल्प पाच वर्षांचा एक टप्पा या माध्यमातून चार टप्प्यांत करता येतील, असे सल्लागारांनी सांगितले. सादरीकरण झाल्यावर उपरोक्त प्रकल्पावर या क्षेत्रातील तज्ज्ञांसह नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. वाहतुकीशी निगडित सूचनाही करण्यात आल्या. त्यांचा अंतर्भाव करून वाहतूक आराखडा अंतिम करण्यात येणार असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. बैठकीस नगरसेवक, विविध विभागांचे अधिकारी, शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, सेवाभावी संस्था व वाहतुकीशी संबंधित संघटनांचे प्रतिनिधी, जागरूक नागरिक उपस्थित होते.

वाहतुकीचे सर्वेक्षण

सर्वेक्षणाद्वारे वाहतुकीचे प्रमाण निश्चित करण्यात आले. या अभ्यासावरून मुंबई-आग्रा महामार्ग आणि नाशिक-पुणे रस्त्यावर सर्वाधिक वाहने धावतात. शहरातून मार्गस्थ होणाऱ्या वाहतुकीत ३३ टक्के वाहने माल वाहतुकीची असून १३ टक्के वाहने प्रवासी आहेत. द्वारका, सीबीएस, बिटको आदी चौकांतून दिवसभरात एक लाखहून अधिक वाहने मार्गस्थ होतात. शहर बस वाहतुकीचा लाभ ३२ टक्के विद्यार्थी तर ७१ टक्के दररोज प्रवास करणारे नागरिक घेतात. वाहन तळाच्या सर्वेक्षणात ९० टक्के वाहने दोन तासांहून कमी वेळासाठी उभी केली जात असल्याचे निदर्शनास आले.

शहराला ६९८ बसची गरज

शहर बस वाहतुकीच्या मुद्दय़ावरून एसटी महामंडळ आणि महापालिका यांच्यात वाद सुरू आहे. महामंडळाने बसच्या फेऱ्या कमी केल्यामुळे विद्यार्थी व प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या स्थितीत सल्लागार कंपनीने लोकसंख्येच्या निकषानुसार सध्या शहराला ६९८ बसची गरज असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी नव्या बसची खरेदी सुचविण्यात आली. सार्वजनिक वाहतूक सक्षम झाल्यास दुचाकीचा वापर कमी होईल. २०३६ मध्ये नाशिकची लोकसंख्या ३३.२२ लाख इतकी असेल. तेव्हा शहरात १३२९ बसेसची गरज भासणार आहे. पाच महत्त्वाच्या मार्गावर अधिक बसेस चालवून इतर मार्गावर कमी वारंवारितेवर बस चालविण्याची सूचना करण्यात आली. अ‍ॅटोरिक्षामधील वाहतूक तीन प्रवाशांपर्यंत मर्यादित करून मीटरप्रमाणे भाडे वसुली करावी. तसेच रिक्षाचा बस वाहतुकीला पर्याय म्हणून नव्हे तर पूरक म्हणून वापर करण्यास सुचविण्यात आले आहे.

सायकल वापरास प्रोत्साहन

शहरातील महत्वाच्या ६० किलोमीटर व इतर ५९ किलोमीटरच्या रस्त्यांचे रुंदीकरण आराखडय़ात सुचविण्यात आले. तसेच ५८ किलोमीटरचे वर्तुळाकार रस्ते प्रस्तावित करण्यात आले. पादचाऱ्यांना सुरक्षित भ्रमंतीसाठी १५० किलोमीटरचे पदपथ करण्याची गरज आहे. तसेच सायकल वापरास प्रोत्साहन देण्याकरिता सार्वजनिक सायकल शेअर ही संकल्पना मांडण्यात आली. सायकलस्वारांसाठी ५४ किलोमीटरचे स्वतंत्र मार्ग तर ९३ किलोमीटरचे सामायिक मार्ग सुचविले आहेत. सायकलसाठी महत्त्वाच्या ठिकाणी केंद्रे उभारावीत, असे सुचविले गेले. विविध चौकांत वाहतुकीची कोंडी होते. त्यासाठी सिग्नल यंत्रणा, चौकांची रचनात्मक सुधारणा, पादचारी क्रॉसिंग, उड्डाण पुलचा अंतर्भाव असून चौकातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र उपाय सांगण्यात आले आहेत.

नवीन ट्रक टर्मिनल

शहरात येणाऱ्या मालवाहू वाहनांना सकाळी आठ ते रात्री आठ या बारा तासांसाठी बंदी केल्यास वाहतुकीच्या समस्या कमी करून  महापालिकेला उत्पन्नही मिळवता येईल. माल वाहतुकीच्या वाहनांना शहराबाहेर थांबण्यासाठी ट्रक टर्मिनल उभारावे. त्या ठिकाणी मालाची चढ-उताराची व्यवस्था, चालकांना थांबण्याची व्यवस्था करावी. आडगाव येथे ट्रक टर्मिनल अस्तित्वात असून त्याच धर्तीवर चेहेडी व मानूर परिसरात प्रत्येकी एक टर्मिनल सुचविण्यात आले. वाहनतळाचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध ठिकाणी पे अ‍ॅण्ड पार्कची व्यवस्था करावी. महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्यालगत वाहनतळ व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.