देवळा-मालेगाव, घोटी-सिन्नर रस्त्यांची चाळण

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची वाट लागली असून सर्वत्र खड्डेच खड्डे झाल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. त्यातही देवळा-मालेगाव, घोटी-सिन्नर, नाशिक-दिंडोरी या रस्त्यांची स्थिती अधिक बिकट आहे. रस्ते न सुधारल्यास आंदोलन करण्याचा इशाराही आता काही संघटनांनी दिला आहे.

घोटी-सिन्नर रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांना खड्डय़ांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवसा आणि रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अतिशय धोकादायक बनले आहे. कोटय़वधींचा खर्च करूनही प्रत्यक्षात या रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यांच्या दुर्दशेमुळे वाहनधारकांसह सारेच त्रस्त झाले आहेत. केवळ डागडुजी न करता आराखडा तयार करून महामार्गाचे नवरात्रीपूर्वी मजबुतीकरण करावे, अशी जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

घटस्थापना केल्यानंतर या महामार्गावरून आम्ही कोणतेही वाहन जाऊ  देणार नाही. बांधकाम खात्याचे अधिकारी, शासनाचे अधिकारीही आम्ही जाऊ  देणार नाही. त्या वेळी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवल्यास त्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या वेळी उद्योजिका मनीषा देवगिरे, साकूरच्या सरपंच सविता सहाणे, बचत गटाच्या अध्यक्षा माधुरी भगत, उपाध्यक्षा रंजना भगत आदी उपस्थित होते.

सौंदाणे-वघई राज्यमार्ग २२ वरील मालेगाव सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असलेल्या देवळा-मालेगाव या दरम्यानच्या रस्त्याची अधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे चाळण झाली आहे. या रस्त्यावर सर्वत्र खड्डेच दिसून येत असून त्यातून रस्ता शोधावा लागत असल्याची वाहनचालकांची प्रतिक्रिया आहे.

सौंदाणे-देवळा फाटय़ापासून देवळा हे अंतर सुमारे १० किलोमीटर आहे. या रस्त्याने जीव मुठीत धरुनच वाहन चालवावे लागते. कसरत करणे म्हणजे काय, याचा अनुभव या रस्त्याने वाहन चालवितांना येतो. देवळ्याकडून मालेगावकडे जाणारा नऊ किलोमीटरचा रस्ता काही ठिकाणच्या खड्डय़ांचा अपवाद वगळता बरा आहे. सौंदाणे-वघई या राज्य मार्गावरून मोठय़ा प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू असते. देवळा, कळवण, सटाणा तालुक्यातून मोठया प्रमाणात शेतकरी आपला शेतमाल उमराणे आणि मालेगाव येथे विक्रीसाठी नेत असतात. तसेच हतगड, सापुतारा, वघई, वाझदा, दिव, दमण आदींसह जवळच असलेल्या गुजरात आणि मालेगाव, मनमाडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे वाहन चालवतांना मोठे खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात झालेोहेत.

नांदुरी येथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला तसेच सापुतारा या पर्यटनस्थळी जाणाऱ्या भाविकांचा आणि पर्यटकांची वर्दळ याच मार्गाने होत असून देखील संबधित विभाग रस्ता दुरूस्तीकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गावरुन नियमितपणे प्रवास करणाऱ्या वाहनचालकांचे वाहनांसह स्वत: चे हाल होत आहेत.

देवळा रस्त्यावरील करला नाल्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला तीव्र उतार असल्यामुळे तसेच सिंद ओहोळ नाल्याजवळ एस आकाराचा तीव्र वळण रस्ता असल्याने येथे नेहमीच अपघात होत असतात. या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह आवश्यक त्या सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे गरजेचे झाले आहे.