14 August 2020

News Flash

दुष्काळग्रस्त तीन गावांची पाणी टंचाईतून कायमस्वरुपी मुक्तता

कित्येक किलोमीटर पायपीट करून आणावे लागणारे पाणी आता गावातील नळावर उपलब्ध झाले आहे.

पेठ तालुक्यातील शेवखंडी येथे जलप्रकल्पाचे लोकार्पण करताना ज्येष्ठ महिला. समवेत सोशल नेटवर्किंग फोरम आणि आयएमए नाशिकचे पदाधिकारी.

सोशल नेटवर्किंग फोरम, आयएमए नाशिकच्या जल प्रकल्पाचे लोकार्पण
पेठ तालुक्यातील टंचाईने ग्रासलेल्या शेवखंडी, खोटरेपाडा आणि फणसपाडा या तीन गावांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या संकटातून मुक्तता मिळाली आहे. कित्येक किलोमीटर पायपीट करून आणावे लागणारे पाणी आता गावातील नळावर उपलब्ध झाले आहे. सोशल नेटवर्किंग फोरमच्या संकल्पनेतून आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या आर्थिक मदतीतून या तीन गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यात यश आले आहे. या जल प्रकल्पाचे लोकार्पण पाण्यासाठी आजवर वणवण भटकंती करणाऱ्या ज्येष्ठ महिलांच्या हस्ते तर फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि आयएमचे अध्यक्ष अनिरुध्द भांडारकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाले.
शेवखंडी येथे झालेल्या या सोहळ्यास आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत देवरे, डॉ. पंकज भदाणे, पेठचे माजी सभापती मनोहर चौधरी आदी उपस्थित होते. आयएमची आर्थिक मदत, फोरमचे योगदान आणि ग्रामस्थांचे श्रमदान या तिन्ही बाबी जुळून आल्यामुळे अवघ्या सहा लाखात हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकल्याचे गायकवाड यांनी सांगितले. डॉ. भांडारकर यांनी ग्रामीण भागात आरोग्य व पाणी या दोन्ही सुविधा देण्यासाठी पुढील काळातही असे उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांना फोरमच्यावतीने विविध झाडांची रोपे देऊन प्रत्येकाने घरासमोर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करावे, असे आवाहन करण्यात आले. शेवखंडी, खोटरेपाडा आणि फणसपाडा या तीन गावात अनेक वर्षांपासून पाण्याचे दुर्भिक्ष होते. गावातील विहिरी व हातपंपाचे पाणी आटल्याने हंडाभर पाण्यासाठी तासंतास प्रतीक्षा करावी लागत असे. त्यामुळे दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून डोक्यावर हंडे वाहून आणण्याशिवाय पर्याय नव्हता. ग्रामपंचायतीकडून राबवण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचेही पाणी आटल्याने पाण्याची टाकी व जलवाहिनीचा खर्च वाया गेल्याची स्थिती होती. ग्रामस्थांनी साकडे घातल्यानंतर सोशल नेटवर्किंग फोरमने हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. नदीवरील जमिनीची पाहणी करून शाश्वत ठिकाणी विहीरीसाठी जागा शोधण्यात आली. उन्हाळ्यात या विहिरीला काठोकाठ पाणी लागले. तिथून पाणी वाहिनीने गावात आणण्यात आले. गावातील टाकी आणि पाणी वितरण यंत्रणेचा वापर करून नळाद्वारे ते घराजवळ उपलब्ध करण्यात आले. यामुळे पाण्यासाठीची पायपीट बंद झाल्यामुळे ग्रामस्थांसह महिलांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2016 2:19 am

Web Title: drought affected three villages water problem solve permanently
टॅग Drought
Next Stories
1 इलेक्ट्रॉनिक्स व इलेक्ट्रीकल उद्योगांसाठी आशादायक चित्र
2 प्रभागातील गुन्हेगारीमुळे अस्वस्थ महापौरांची आता ‘भयमुक्त नाशिक’ची घोषणा
3 जमिनीसाठी जन्मदात्यांना घराबाहेरचा रस्ता
Just Now!
X