News Flash

दुष्काळाच्या दाहकतेचे ग्रामीण भागात अधिक चटके

पोटा-पाण्याची गरज भागविण्यासाठी शहर भागात स्थलांतर  

संग्रहित छायाचित्र

पोटा-पाण्याची गरज भागविण्यासाठी शहर भागात स्थलांतर  

जिल्ह्य़ात दुष्काळाचे सावट असल्याने बळीराजा पुन्हा एकदा गर्तेत ढकलला जात असून दुष्काळाची व्याप्ती फक्त बळीराजापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. समाजघटकातील प्रत्येकाला दुष्काळाची दाहकता जाणवत असून पोटा-पाण्याच्या गरज भागविण्यासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर सुरू झाले आहे. नाशिक शहर परिसरात बाहेरगावाहून नोकरी किंवा पडेल ते काम शोधणाऱ्यांची संख्या वाढत असून यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासी भागासह ग्रामीण भागातूनही जथेच्या जथे नाशिक  शहर परिसरात दाखल झाले. आपआपल्या आर्थिक क्षमतांचा विचार करता काहींनी गोदाकाठी, मोकळ्या मैदानाच्या बाजूला, तर काहींनी भाडेतत्त्वावर खोली घेत रोजगार शोधण्यास सुरुवात केली. काहींनी मूळ गावी थांबत नाशिकला ये-जा करण्याचा पर्याय निवडला. पुरुष मंडळी काही अंशी औद्योगिक वसाहत, बांधकाम व्यवसायात काम करत असताना महिला वर्गही आता वेगवेगळ्या पर्यायाची चाचपणी करत आहे.

इगतपुरी तालुक्यातील सैंदेगाव येथील शकुबाई यांना आता वयोमानाप्रमाणे शेती कामे होत नाहीत.  अन्य  कामधंदाही नसल्यामुळे   दुधापासून दही तयार करून नाशिकच्या गल्लीबोळात ते त्या विकत आहेत. सकाळी सात ते दुपारी बारा या वेळेत दही विकायचं. गाव ते नाशिक येण्याजाण्यात १५० रुपये खर्च होतात. त्याउपर काही खाण्या-पिण्यात खर्च होतो. दही संपल्यावर दुपारनंतर घरी परतते, असे त्यांनी सांगितले.

सातपूर-सिडको परिसरात मिरची-मसाल्याचे पदार्थ विकणाऱ्या दुकानात बाहेरगावाहून आलेल्या महिला या लाल मिरच्यांचे देठ काढून देण्याचे काम करतात. प्रति किलोमागे १० रुपये अशा दराने दिवसभर त्यांचे काम सुरू असते. याच ठिकाणी आमचा संसार आम्ही मांडला आहे. पती सकाळीच काम शोधण्यासाठी निघून जातो. दिवसभर काम सुरू असते. रात्री मालाची राखण करतो. त्याचे वेगळे पैसे मिळतात. असे संजाना पखाले यांनी सांगितले.

रोजगारासाठी असेही काम

शहर परिसरात काही महिला गल्लीबोळात उन्हाळी कामे करून देण्यासाठी दिवसाकाठी २०० रुपये मजुरीवर काम करत आहेत. यामध्ये वर्षांला लागणारे गहू, तांदूळ निवडून देणे, घरातील साफसफाई, नगावर गोधडी शिवण्यासाठी ३०० रुपये अशा धर्तीवर काम सुरू आहे. काही ठिकाणी गावात दुष्काळ आहे. पोटापाण्याला पैसा नाही, असे सांगत काही लोकांकडून भिक्षुकी सुरू आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 12:58 am

Web Title: drought in nashik
Next Stories
1 राज ठाकरे, मुख्यमंत्री यांच्या सभांची उत्सुकता
2 पंतप्रधानांची मर्जी सांभाळण्यासाठी मुख्यमंत्री शांत
3 उशाशी धरण असूनही बडर्य़ाची वाडी तहानलेली
Just Now!
X