नेत्रदीपक आकाशकंदील.. आकर्षक पणत्या..फटाक्यांनी सजलेली दुकाने.. पूजा साहित्याचे विशेष ‘कीट’.. खतावणी व रोजमेळच्या वह्या.. दीपावलीच्या पाश्र्वभूमीवर अशा नानाविध साहित्याच्या खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये झुंबड उडाल्याचे पाहावयास मिळत आहे. शहरी भागात उत्साही वातावरण असले तरी ग्रामीण भागात मात्र या सणावर दुष्काळाचे मळभ आहे.

तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास सुरुवात होत असताना खरेदीचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कामगारवर्ग तसेच शासकीय नोकरदारांच्या हाती वेळेवर बोनस पडल्याने त्याचा परिणाम बाजारपेठेतील खरेदी-विक्रीवर झाला. महागाईची ओरड होत असली तरी खरेदीवर त्याचा कोणताही परिणाम दिसून येत नसल्याने व्यावसायिकही सुखावले आहेत. महागाईची पर्वा न करता सर्व प्रकारच्या खरेदीच्या माध्यमातून दीपोत्सवाचे स्वागत करण्यात सर्वजण मग्न आहेत. शहरी बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांनी वेगवेगळ्या योजना सादर केल्या आहेत. काहींनी ग्राहकांची धावपळ होऊ नये यासाठी एकाच छताखाली फराळापासून दिवाळीसाठी आवश्यक पूजा साहित्यांचे विशेष दीपावली कीट उपलब्ध करून दिले आहे.
दिवाळीचे मुख्य आकर्षण म्हणजे आकाशकंदील. त्याचे विविध प्रकार बाजारात दाखल झाले आहेत. पर्यावरणस्नेही ‘हॅण्डमेड पेपर’ तसेच कापडी आकाशकंदिलासही अनेकांनी पसंती दिली आहे. सर्वसाधारणपणे आकाशकंदील ७० पासून ५०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यात घुमट, चौकोनी, गोलाकार, दिवा असे प्रकार आहेत. प्लाास्टिकद्वारे तयार केलेला ‘फायर बॉल’अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. जुन्या चांदनी आकारातील आकाशकंदील ५० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत आहेत. याशिवाय, सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या लहान आकारातील आकाशदिव्यांच्या माळांची ५० रु पये डझन या दराने विक्री होत आहे. नेहमीच्या मातीच्या साध्या पणत्या १५ ते २० रुपये डझन आहेत. कुंदन वर्क, रंगीत, टिकली वर्क, सिरॅमिक वर्क असणाऱ्या पणत्या, मेणाच्या जेल, फ्लोटिंग, सुगंधी या प्रकारांसाठी खिसा जड ठेवणे आवश्यक आहे. अभ्यंग स्नानासाठी आवश्यक उटणे, सुगंधी तेलाची काही खास उत्पादने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
संगणकीय युगात पारंपरिक खतावणी व रोजमेळ, रोजनिशी आपले महत्त्व अबाधित राखून आहेत. अगदी तळहाताच्या आकारातील खतावण्यांपासून ‘ए – ४’ आकारातील रोजमेळा, खतावण्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यास ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. प्रकाशाने नभांगण व्यापणाऱ्या फटाक्यांना बच्चेकंपनीची तर ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ग्राहकांनी कमी आवाजाचे म्हणजेच म्युझिकल, केवळ प्रकाशझोत फेकणाऱ्या फटाक्यांना पसंती दिली आहे. फटाक्यांमुळे ध्वनी व हवेतील प्रदूषणाबाबत कितीही ओरड होत असली तरी खरेदीच्या उत्साहाला कोणताही ‘ब्रेक’ लागलेला नाही. नाशिक जिल्हा फटाका असोसिएशनच्या स्टॉलवर फटाके खरेदीसाठी गर्दी होत आहे. फ्लॉवरपॉट, भुईचक्र, रॉकेट, लेस अशा पारंपरिक प्रकारांसोबत चिनी माल खरेदीकडेही काहींचा कल आहे. त्यात सिग्नल लाइट, कलर फ्लॅश, माइन ऑफ क्रॅकर्स, व्हीसल व्हीज, ट्रीपल फन, एके-४७, ब्रेक डान्स, पिकॉक डान्स, ओह ला लाल अशा विविध फॅन्सी प्रकारांचा समावेश आहे. कपडे खरेदीलाही असेच उधाण आले असून एकूणच बाजारपेठ दिवाळीमय झाल्याचे दिसत आहे.
आज वसुबारस
तेजाचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दीपोत्सवास शनिवारी गाय-वासरू पूजन अर्थात वसुबारसने सुरुवात होत आहे. यंदा प्रकाशाचा हा उत्सव सहा दिवस रंगणार आहे. गत काही वर्षांत एकाच वेळी दोन दिवस येत असल्याने या उत्सवाचे दिवस कमी-अधिक होत असत. परंतु, यंदा दीपोत्सवाचा पुरेपूर आनंद मिळणार आहे. लक्ष्मीपूजन व भाऊबिजेसाठी अजून तीन ते चार दिवसांचा अवधी असतानाही बाजारपेठांमधील खरेदीचा माहोल कायम आहे. सोमवारी धनत्रयोदशीनिमित्त धन-धान्याची पूजा करून साजरी करण्यात येईल. आरोग्य क्षेत्रात या दिवसाला वेगळे महत्व आहे. आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्याने वैद्य मंडळी धन्वंतरीचे पूजन करतात. आरोग्यरूपी धन सर्वाना प्राप्त व्हावे, हाही धनत्रयोदशीला धन्वंतरीचे पूजन करण्याचा उद्देश आहे.
धन्वंतरीचे विचार ज्या माध्यमातून सर्वासमोर आले त्या चरक संहितेत वैद्यकीय क्षेत्रासाठी एक प्रतिज्ञा दिली आहे. तिचे पालन आजच्या काळात करणे गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील मंडळीचे म्हणणे आहे.
धन्वंतरी पूजनासाठी आरोग्य क्षेत्र सज्ज झाले आहे.