तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून या गंभीर प्रश्नाकडे तालुक्यातील संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. कामात दिरंगाई करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा आ. डॉ. राहुल आहेर यांनी येथे मंगळवारी आयोजित टंचाई आढावा बैठकीत दिला.
तालुक्यात पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याने पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असून तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन टंचाईबाबत अहवाल तयार करावा व तत्काळ शासनास सादर करण्याची सूचना डॉ. आहेर यांनी केली. तालुक्यातील ज्या गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी विहिरी आरक्षित करण्यात आल्या आहेत, तिथे २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याचे तसेच नवीन पर्यायी विहिरी आरक्षित करण्याचीही सूचना त्यांनी केली. तालुक्यातील बहुतांश गावे व नळपाणी पुरवठा योजना या गिरणा नदीवरील पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती केदा आहेर यांनी दिली. दरम्यान, टंचाईसारख्या महत्त्वाच्या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीस तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या भारती पवार व जिल्हा परिषद सभापती उषा बच्छाव गैरहजर राहिल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत तालुका दुष्काळी जाहीर करावा, गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा त्वरित बंद करावा, सक्तीचे वीज देयक वसुली त्वरित बंद करावे, टँकरच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे आदी मागण्या करण्यात आल्या.